लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ज्या गुन्ह्यात न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली, हा कारावास भोगून बाहेर आल्यावर देखील सुरेश बबनराव केवारे (वय ६५, रा. खामगाव, जि. बुलढाणा) याने पुन्हा तोच गुन्हा केला आहे. गजानन कॉलनीतील जागृत महादेव मंदिरातील पितळी दिवे व इतर साहित्य चोरीत केवारे याला पुन्हा अटक झाली आहे. यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे त्याचे बिंग फुटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवारे याने शनी पेठेतील जागृत मनुदेवी मंदिर, इंद्रप्रस्थ नगरातील दुर्गा माता मंदिर, कांचन कॉलनीतील श्रीवीर हनुमान मंदिर, तपस्वी हनुमान मंदिर, एमआयडीसी हद्दीतील गृहकुल हौसिंग सोसायटीतील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर, मोहन टॉकीजसमोरील महादेव मंदिर, कांचन नगरातील लक्ष्मी नारायण मंदिर, आदर्श नगरातील गणपती मंदिर, नेहरू नगरातील दत्त मंदिर यासह इतर मंदिरातील नाग, तांब्याच्या वस्तू व इतर साहित्य चोरी केले आहे.
असे फुटले बिंग
गजानन कॉलनीतील जागृत महादेव मंदिरातील पितळी दिवे व इतर साहित्य चोरी झाले होते. त्याशिवाय या भागात दोन-तीन ठिकाणी चोरीच्या घटनाही घडल्या होत्या. एटीसीचे भास्कर पाटील यांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्थानिक गुन्हे शाखेचे विजयसिंग पाटील यांना दिले. पाटील यांनी फुटेजवरून केवारे याला लगेच ओळखले. यापूर्वी मंदिरातील अनेक चोरीच्या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यातआले होते.
केवारेचा वावर असलेल्या ठिकाणच्या खबऱ्यांमार्फत तो रेल्वे स्टेशन परिसरात आल्याची माहिती मिळताच विजयसिंग पाटील व सहकाऱ्यांनी त्याला अटक केली.
नाग चोरीच्या गुन्ह्यात एक वर्षाची शिक्षा
सुरेश केवारे याने ६ जानेवारी २०१९ रोजी बळीराम पेठेतील रुद्रलाल मारोती मंदिरातील महादेवाच्या पिंडीवरील २६०० रुपये किमतीचा तांब्याचा नाग चोरला होता. याप्रकरणी सुरेश मोतीलाल दिवेकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. सुनील दामोदर पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले होते. यात न्यायालयाने १३ जून २०१९ रोजी केवारे याला दोषी धरून एक वर्ष कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. केवारे याने ही शिक्षा भोगली. त्यानंतर पुन्हा जळगाव शहरात मंदिरातील वस्तू चोरीचे उद्योग सुरुच ठेवले.