अहमदनगर : महापालिकेने रविवारी मध्यरात्री रेल्वे स्टेशन परिसरातील दोन आणि सांगळे गल्लीतील तीन अशी पाच मंदिरे भुईसपाट केली. आतापर्यंत २१ मंदिरावरील कारवाई पूर्ण केली आहे. मल्हार चौकात एका तरुणाने गोंधळ घातल्याने पोलीस आणि मनपा पथकाची एकच धावपळ झाली. याच चौकात काही तरुणांनी घोषणाबाजी केली.महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलिसांनी रविवारी मध्यरात्री रेल्वे स्टेशन परिसरात संयुक्त कारवाई केली. मल्हार चौकातील मारुती मंदिर, शिवनेरी-गवळीवाडा परिसरातील लक्ष्मी माता मंदिरावर मध्यरात्री, तर सांगळे गल्लीतील तीन मुंजोबा मंदिरावर पहाटेच्या सुमारास कारवाई झाली. छोट्या मंदिरांवर कर्मचाºयांच्या सहाय्याने कारवाई, तर एक मंदिर जेसीबीने पाडण्यात आले. मल्हार चौकात मारुती मंदिरासमोर एका युवकाने गोंधळ घातला. तो युवक जेसीबीसमोर झोपल्याने काही वेळ कारवाई थांबविण्यात आली. पोलिसांनी त्याला बाहेर काढताच कारवाई सुरू झाली. याच चौकात काही युवकांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी तरुणांची समजूत घातली. स्थानिकांचा विरोध मोडीत काढून महापालिकेच्या पथकाने ही कारवाई फत्ते केली.
नगर रेल्वेस्टेशन परिसरातील मंदिरे हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 3:32 PM