लोकमत न्यूज नेटवर्क
अकोले : निसर्ग लेणं लाभलेला अकोले तालुका म्हणजे चंदेरी प्रपात आणि अवखळ धबधब्यांचं माहेर असून, येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. येथे अनेकांना सेल्फीचा मोह आवरत नाही. मात्र, सेल्फी घेताना सावधानता बाळगणे गरजे आहे. अन्यथा हा सेल्फीचा मोह जिवावर बेतू शकतो.
प्रवरा नदीवरील अप्रतिम रंधा धबधबा, आढळा नदीवरील सावरगाव पाट येथील तवा धबधबा, गर्दणी येथील शिवडोह धबधबा व भंडारदरा धरण पाणलोटातील रिंग रोडवरील नेकलेस, गायमुख, न्हानी, वावडी धबधबा तर साम्रदचा गिरणाई धबधबा पाहण्यासाठी निसर्गप्रेमी पर्यटकांची मांदियाळी पावसाळ्यात ठरलेली असतेच.
तालुक्यातील रंधा धबधबा व गिरणाई धबधबा येथे संरक्षक कठडे झाल्याने पूर्वीसारखे धोकादायक नाहीत. मात्र, संरक्षक कठडे ओलांडून काही जण सेल्फी घेण्याचा आततायीपणा करताना दिसतात. हे धबधबे सुमारे अडीशे - तीनशे ते दीड हजार फूट खोल कातीव काळ्या पाषाणाचे आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. हे धबधबे धोकादायक ठरू शकतात.
.................
रिंग रोडवरील धबधबे दुरूनच पाहा
घाटघर - रतनवाडी रिंग रोड परिसरातील धबधबे दुरून पाहणे धोकादायक नाही. पण, जवळून धबधबा मोबाईलमध्ये सेल्फीने टिपताना निसरड्या, शेवाळलेल्या खडकांमुळे धोकादायक ठरल्याच्या घटना घडल्या आहेत. धबधब्यांसोबत सेल्फीचा मोह आपल्या जिवावर बेतू शकतो. म्हणून निसर्ग कवेत घेण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाईने संयम पाळायला हवा.
.............
ना धोक्याची सूचना, ना कर्मचारी
तालुक्यातील सावरगाव पाट येथील तवा धबधबा असाच धोकादायक आहे. धोक्याची सूचना देणारा कोणताही बोर्ड नाही. मात्र, स्थानिक गावकरी, शेतकरी पर्यटकांना धोक्याची कल्पना देतात. मार्गदर्शन करतात. देवठाण धरणाच्या पाणलोटातील हा धबधबा अकोले - समशेरपूर रस्त्यालगत देवठाण गावापासून पाच - सहा किलोमीटर अंतरावर हा सावरगावपाटनजीक दोन किलोमीटरवर हा धबधबा आहे. जेवढे दिवस आढळा नदी प्रवाहित असते तेवढे दिवस हा धबधबा सुरू असतो. अकोले शहरापासून पाच किलोमीटर गर्दणी शिवारात शिवडोह धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. या शिवडोह धबधबा परिसरात असंख्य छोटे धबधबे चंदेरी प्रपात आविष्कारले असून, येथील निसर्ग पर्यटकांना खुणावत आहे. येथेही धोक्याची सूचना देण्यासाठी फलक वा वन विभागाचा कर्मचारी नाही. शिवडोह धबधबा येथे दोघे जण पडल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत, असे स्थानिक सांगतात.
....................
अडीचशे फुटांवरून कोसळतो तवा धबधबा
आढळा नदीचा संपूर्ण प्रवाह अडीचशे फूट खोल दरीत कोसळून तवा पात्र तयार झाले आहे. उंच कड्यावरून हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. जागा कमी आणि पर्यटक जास्त अशी परिस्थिती होते, ते धोकादायक ठरू शकते.
आढळा नदीवरील सांगवी लघु पाटबंधारे तलावाच्या सांडव्याजवळ असाच धोकादायक धबधबा आहे. पण, त्याची उंची फार नाही. फोफसंडी, आंबीत, कुमशेत, पाचनई भागात असंख्य छोटे - मोठे चंदेरी प्रपात, धबधबे पावसाळ्यात आविष्कारलेले दिसतात.
.........................
तवा धबधबा परिसरात शेतकरी मालकी हक्काची जमीन आहे. धबधबा नदी पात्रात आहे. त्यामुळे वन विभागास तेथे काहीच काम करता येत नाही.
-रामचंद्र बुळे, वनरक्षक, समशेरपूर -पट्टा किल्ला परिसर.
............
तवा धबधबा हा सावरगाव पाट गावचा निसर्ग ठेवा आहे. गावकरी पर्यटकांची काळजी घेतात. ग्रामपंचायतीने धोक्याची सूचना देण्यासाठी फलक लावणे अपेक्षित आहे.
- नवनाथ नेहे, ग्रामस्थ, सावरगावपाट
..............
गदर्णी येथील शिवडोह परिसरात वन विभागाने पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. येथील खडक निसरडे असून, पाय घसरून येथे पूर्वी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. निसर्गाचा आनंद घेणाऱ्यांनी काळजी घ्यावी.
-परबत नाईकवाडी, सभापती, कृषी उत्पन्न समिती
.....
फोटो
१४ धबधबा