जामखेड : येथील दहा सायकलस्वार युवकांनी जामखेड ते प्रतापगड हे २८५ किलोमीटरचे अंतर अवघ्या १९ तासात पूर्ण केेले. या प्रवासात त्यांनी ठिकठिकाणी पर्यावरण व सायकलिंगमुळे होणारे शारीरिक फायदे याबाबत संदेश दिला.
मागील दोन वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम चालू आहे. सायकलस्वारांनी ५ फेब्रुवारी रोजी पहाटे ६ वाजता जामखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रवासाला सुरुवात केली. यामध्ये डॉ. पांडुरंग सानप, डॉ. महेश घोडके, डॉ. अशोक बांगर, हॉटेल व्यावसायिक दिलीप पवार, शशिकांत राऊत, भास्कर भोरे, उमेश घोडेस्वार, समीर शेख, आर्यन सानप (१४ वर्षे), अभिषेक घोडके (१४ वर्षे) यांचा यात समावेश होता. शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जागोजागी स्वागत करत चहा, नाष्ट्याची सोय केली होती.
पहिल्या दिवशी १९० किलोमीटर सायकल प्रवास करत वाॅटर स्टेशन येथे मुक्काम केला. ६ फेब्रुवारी रोजी उर्वरित प्रवास पूर्ण करत संध्याकाळी ५ वाजता प्रतापगड गडावर जाऊन सायकल प्रवासास पूर्णविराम दिला.
डॉ. महेश घोडके यांनी प्रवासास शुभेच्छा देत सर्वांचे आभार मानले. समीर शेख यांनी जय शिवराय...च्या घोषणा देत या प्रवासाचा समारोप केला.
...
जामखेड ते प्रतापगड या सायकल प्रवासात आम्ही पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती केली. सायकलिंगमुळे होणारे शारीरिक फायदे आम्ही गावोगावी समजून सांगितले. आपले जीवन निरोगी जगावे असे सर्वांना आवाहन केले. या सायकलवारीने आम्हाला खूप समाधान लाभले.
- डॉ. महेश घोडके, जामखेड.
...