अहमदनगर : गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी डीजेविरुद्ध कारवाई करून डीजे साहित्य जप्त केल्याने यंदाच्या गणेशोत्सवात मंडळांचा आवाज मर्यादित होता. त्यामुळे कुठेच कर्णकर्कशता नव्हती की गोंगाटही झाला नाही. मंडळांनी पारंपरिक वाद्यांवर अधिक भर दिला. आता विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेचा आवाज वाढणार का? याबाबतची धास्ती वाढली आहे. मात्र आवाज वाढल्यास कारवाईचा इशाराच पोलीस प्रमुखांनी दिला आहे.शहरातील मानाच्या १२ मंडळांनी यंदा गणेशोत्सवात डीजे वाजविणार नाही, असे प्रतिज्ञापत्रच पोलिसांना लिहून दिले होते. त्यामुळे त्यांचा आदर्श घेत शहरातील अनेक मंडळांनीही उत्सवात डीजे लावला नाही. ज्यांनी लावला त्यांचा आवाजही मर्यादेबाहेर गेला नाही. गणेशउत्सवाच्या पहिल्या दिवशी स्थापनेनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत पोलिसांनी मंडळांच्या प्रमुखांसह डीजेचालकांवरही गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे मंडळे आणि डीजेचालक चांगलेच धास्तावले. त्याचा परिणाम उत्सवात दिसला. देखाव्यांचे आवाज मर्यादेत होते. (प्रतिनिधी)उत्सवातील ध्वनिप्रदूषण आणि निर्माल्यापासून होणारे प्रदूषण याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रबोधन करणे आवश्यक होते. डीजेची ध्वनिपातळी मोजणे हे या प्रदूषण नियंत्रण कार्यालयाचेच काम आहे. मात्र या कार्यालयाचा एकही कर्मचारी कुठेच दिसला नाही. याउलट डेसीबल मोजणारे मीटर हे पोलिसांच्या हाती होते. पोलिसांनी शहरातील सर्व मंडळांची ध्वनिपातळीची मोजणी केली, मात्र कुठेच आवाज चढलेला नव्हता.
दहा दिवस आवाज खाली
By admin | Published: September 07, 2014 11:42 PM