कर्जत : सोमवारी (दि.१०) शहरातील बुवासाहेबनगरमध्ये भरदिवसा झालेल्या चोरीची पोलिसांनी दोन दिवसात उकल केली आहे. कर्जत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा दहा लाखांचा ऐवज चोरांकडून जप्त केला असून, एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.
शहरातील बुवासाहेबनगर येथील रहिवासी विठ्ठल श्याम दसपुते हे सोमवारी सकाळी घर बंद करून गेले होते. त्यानंतर चोरांनी घराचे कुलूप उघडून साहित्याची उचकपाचक केली असल्याचे ते परतल्यावर लक्षात आले. घरातील एका ड्राॅवरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. चार लाख रुपयांचे आठ तोळे सोने, एक लाख तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचा नेकलेस, एक लाख तीस हजार रुपयांची सोन्याची चेन, एक लाख रुपयांचे सोन्याचे कानातील तीन जोड, पंचवीस हजार रुपयांची अंगठी, दहा हजारांची सोन्याची नथ व दोन लाख दहा हजारांची रोकड अशी एकूण दहा लाख पाच हजार रुपयांची चोरी झाली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कर्जतचे पाेलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी चोवीस तासात या घरफोडीचा छडा लावला. या गुन्ह्यात बीड जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन चोरीबाबत कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. चोरी गेलेल्या ऐवजापैकी सोन्याचे दागिने आणि रोकड असा ९ लाख ९४ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, पाेलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, सोमनाथ दिवटे, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, भगवान शिरसाट, किरण साळुंखे, पोलीस जवान हिंगडे, सुनील चव्हाण, पांडुरंग भांडवलकर, सुनील खैरे, श्याम जाधव, महादेव कोहक, रवींद्र घुंगसे, प्रकाश वाघ, रोहित यामुळ, चंद्रकांत कुसाळकर, अमित बर्डे, सुनील वारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे, अमित बर्डे करत आहेत.