अहमदनगर : पावसाळा सुरू असल्याने धोकादायक शाळा खोल्यांत वर्ग न भरविण्याचा आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने शुक्रवारी जारी केला़ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील साडेनऊशे वर्ग खोल्या धोकादायक असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे़ त्यामुळे सदर वर्ग खोल्यांतील विद्यार्थ्यांची मंदिरे, मंगल कार्यालये किंवा ग्रामपंचायतींच्या जागेत पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे़आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा आदेश दिला आहे़ या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने धोकादायक इमारती निर्लेखित करण्यासाठी ज्या शाळांचा प्रस्ताव पाठविला आहे, अशा खोल्यांत विद्यार्थ्यांना न बसविण्याचा आदेश दिला आहे़मागील शैक्षणिक वर्षात निंबोडी येथील दुर्घटनेनंतर जिल्हा परिषदेने केलेल्या सर्वेक्षणातून ९५९ शाळा खोल्या धोकादायक असल्याचे समोर आले आहे़ उन्हाळ्याच्या सुटीत शाळा खोल्यांची दुरुस्ती झालेली नाही़परिणामी धोकादायक साडेनऊशे शाळा खोल्यांतील मुलांची पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे़निंबोडी येथील शाळा खोली कोसळून तिघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला़ जिल्ह्यात अशी घटना घडू नये, यासाठी जिल्हा परिषदेने बांधकाम विभागामार्फत प्राथमिक शाळांच्या इमारतींची तपासणी केली़ बांधकाम विभागाच्या अहवालानुसार १ हजार ९२ नवीन शाळा खोल्यांची आवश्यकता आहे़ त्यापैकी ४९२ शाळा खोल्या तातडीने बांधण्याची गरज आहे़ उर्वरित ९५९ शाळा खोल्या मोडकळीस आल्या आहेत़त्या पाडून नवीन खोल्या बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे़ शिक्षण विभागाने २९६ खोल्या पाडण्यास मंजुरी दिली आहे़ उर्वरित ६६३ शाळा खोल्यांचे निर्लेखन प्रस्तावित आहेत़ मोडकळीस आलेल्या शाळा खोल्यांची संख्या मोठी असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान जिल्हा परिषद प्रशासनासमोर आहे़
साडेनऊशे शाळा खोल्या मोडकळीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 3:24 PM