अहमदनगर : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. टास्क फोर्सने राज्य सरकारलाही सतर्क केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानेही किमान आणखी दहा हजार बेड तयार ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात सध्या २७ हजार सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या ४० हजारांपर्यंत वाढू शकते. त्यानुसार आणखी दहा हजार बेड तयार करण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासनस्तरावर नियोजन सुरू झाले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा आकडा काही कमी होत नसल्याचे दिसत आहे. एखाद्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांपर्यंत खाली येते आणि पुन्हा दोन-तीन दिवस चार हजारांपर्यंत जाते. टास्क फोर्सने दिलेल्या संकेतानुसार मेच्या शेवटी तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यानुसार राज्यात सगळीकडेच उपाययोजना सुरू करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाने कहर केला. सर्वाधिक ८९५ मृत्यू या एकाच महिन्यात झाले. एप्रिल महिन्यात पॉझिटिव्ह रेटही ३५ टक्क्यांच्या पुढे गेला होता. याच काळात ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर नसल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता. चालू आठवड्यात संख्या कमी झाली असली तरी मे अखेरीस सक्रिय रुग्णांची संख्या ४० हजारांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
-----
ऑक्सिजन
सध्या ६० ते ७० टन ऑक्सिजन जिल्ह्याला मिळतो. जिल्हा रुग्णालयात दर मिनिटाला चारशे लिटर ऑक्सिजननिर्मिती होते. खासगी रिफिलिंग प्लांटवरूनही खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा होतो. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झाले आहे.
--------------
ऑक्सिजन बेड
सध्या जिल्ह्यात पाच हजार ऑक्सिजन बेड आहेत. आणखी दीड ते दोन हजार ऑक्सिजन बेड वाढविण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. तालुका स्तरावर बेड वाढविण्यात येत आहेत. त्यामुळे सात ते आठ हजार ऑक्सिजन बेड तयार होतील.
-----------
कोविड केअर सेंटर
जिल्ह्यात सध्या ९७ कोविड केअर सेंटर आहेत. पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात किमान एक कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आणखी १४ कोविड केअर सेंटर तयार करण्याबाबत प्रशासन स्थानिक स्वयंसेवी संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करीत आहे.
------------
औषधी
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांना लागणारी औषधी, इंजेक्शनबाबत मागणी नोंदविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सध्या रेमडेसिविरचा कोटाही प्रतिदिन ८ ते १० हजार लागण्याची शक्यता आहे.
---------
कुठे किती बेड ?
जिल्ह्यात वाढणारी दैनंदिन रुग्णसंख्या विशिष्ट तालुक्यातच वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये अहमदनगर, अकोले, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी, कर्जत, राहुरी आदी तालुक्यांत रुग्णांची संख्या वाढत आहे. तेथील रुग्णांना शिर्डी येथील साई संस्थानच्या रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. शिवाय स्थानिक कोविड केअर सेंटरमध्ये नवे बेड उपलब्ध होणार आहेत.
-------------
तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हिवरेबाजारने ज्या पद्धतीने गाव कोरोनामुक्त केले, त्याच धर्तीवर प्रत्येक गावात उपाययोजना राबविल्या तर कोरोनाची तिसरी लाट रोखणे सहज शक्य आहे. यासाठी सलग दोन दिवस ग्रामस्तरावरील अधिकारी, सरपंच यांच्याशी थेट संवाद साधला. पोपटराव पवार यांनी त्यात मार्गदर्शन केले, तसेच प्रशासकीय पातळीवरही बेड, कोविड सेंटर वाढविण्याचे नियोजन आहे.
-डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी
--
डमी- नेट फोटो
१२ कोरोना थर्ड वेव डमी
कोविड केअर सेंटर
कोविड (१)
मेडिसिन
ऑक्सिजन बेड
ऑक्सिजन