- शेखर पानसरे
संगमनेर : सुतारकाम करणाऱ्या परराज्यातील कामगाराचा खून करणाऱ्यास दहा वर्ष सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. एच. अमेठा यांनी शनिवारी (दि. २९) हा निकाल दिला.
शंकर साळुंखे (रा. कळस बुद्रूक, ता. अकोले) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. सरबजीत ओमप्रकाश चौहाण (रा. नटाई खुर्द, नटाई कला, ता. रुधौली, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या सुतारकाम करणाऱ्याचे नाव आहे. साळुंखे याच्याविरुद्ध राजू जगधारी राजभर (रा. मलकानी पोस्ट, महुवामुरालपुर, जि. आझमगढ, उत्तर प्रदेश, हल्ली रा. देवठाण रस्ता, अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ४ फेब्रुवारी २०२२ ला अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी राजू राजभर हे अकोले येथे कुटुंबासमवेत आठ वर्षांपासून राहत असताना सुतारकाम करत देवठाण रोड येथे चहाची टपरी चालवत होते.
सरबजीत चौहाण हे देखील त्यांच्यासमवेत राहत होते. फिर्यादी राजभर आणि आरोपी साळुंखे हे एकमेकांना पाच वर्षांपासून ओळखत होते. ३ फेब्रुवारी ला रात्री आठ वाजता ते दोघे भेटले. साळुंखे हा राजभर यांना त्याच्या घरी जेवणासाठी घेऊन गेला होता. जेवण झाल्यानंतर त्याने राजभर यांना चहाच्या टपरीवर आणून सोडले. ‘तु तुझ्या घरी जा, मी पण माझ्या घरी जातो’ असे राजभर बोलले असता त्याचा राग येऊन साळुंखे याने त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. त्यात ते जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी सरबजीत चौहाण यांना बोलावून घेत घडला प्रकार सांगितला. याबाबत चौहाण यांनी साळुंखे याला जाब विचारत चापटीने मारहाण केली होती. त्यानंतर साळुंखे रागाने घरी निघून गेला काही वेळाने तो पुन्हा दुचाकीहून आला. त्याने चौहाण यांना लाकडी दांड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले, तो तेथून निघून गेला. जखमी चौहाण यांना दुचाकीहून सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारकरिता नेले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले असता तेथे डॉक्टर नसल्याने त्यांना खोलीवर नेण्यात आले. ४ फेब्रुवारी ला सकाळी ८. ३० च्या सुमारास जखमी चौहाण यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या प्रकरणी अकोले तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अकोले ग्रामीण रुग्णालयातील डॉ. आर. एस. कवडे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. मच्छिंद्र गवते यांनी काम पाहिले. सदर खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून प्रवीण डावरे यांनी काम पाहिले. त्यांना महिला पोलीस कॉस्टेबल स्वाती नाईकवाडी, प्रतिभा थोरात, दीपाली रहाणे, कॉस्टेबल राम लहामगे यांचे सहकार्य लाभले.