सचिन धर्मापुरीकर, कोपरगाव (जि. अहमदनगर): कोपरगाव मतदार संघातील अनेक शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे पिक विम्याचे अर्ज भरू शकले नाहीत. त्यातच पिक विमा अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै पर्यंतच असल्यामुळे असंख्य शेतकरी विम्यापासून वंचित राहणार होते. त्यामुळे पीक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी दि.२८ जुलै रोजी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेवून पीक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत ३ ऑगस्ट पर्यंत वाढविली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिलीं आहे.
चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले असून राज्य शासनाने यावर्षी पासून 'सर्वसमावेशक पीक विमा योजना' राबविण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासन भरणार असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करून पीक विम्यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे. पिक विमा अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै पर्यंतच देण्यात आलेली होती. परंतु पिक विमा अर्ज भरण्यासाठी सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे मतदार संघातील ६० हजाराच्यावर शेतकरी पिक विमा अर्ज भरू शकले नव्हते. जर पिक विमा अर्ज मुदतीत भरला गेला नाही तर हजारो शेतकरी पीक विम्याला मुकणार होते. त्यामुळे पिक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी आ. आशुतोष काळे यांनी मागील आठवड्यात राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे मांडल्या होत्या.
त्या पत्राची दखल घेवून शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणींची जाणीव ठेवून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पिक विमा अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून देवून हि मुदत ३ ऑगस्ट पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पिक विम्याचा अर्ज भरलेला नाही त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पिक विम्याचा अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिक विमा अर्ज भरून द्यावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे. पिक विमा अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून दिल्याबद्दल मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहे.