तिसगाव : आगामी गळीत हंगामात नियोजित इथेनॉल उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उत्पादनाची चाचणी घेतली जाईल, असा विश्वास वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांनी व्यक्त केला.
वृद्धेश्वर कारखाना अधिमंडळाची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी दुपारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. ९६५ ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी सभेस ऑनलाईन सहभाग नोंदविला व विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना समर्थन दिले.
आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, कारखान्याचे प्रमुख अधिकारी संचालक मंडळ सदस्य आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमुळे प्रकल्प उभारणीसाठी ८५ टक्के रक्कम जिल्हा सहकारी बँकेकडून तर उर्वरित १५ टक्के रक्कम स्वनिधीतून उभी करावयाची आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी सभासदासह तालुक्यातील इतर सहकारी संस्था, व्यापारी यांनी कारखान्यास स्वनिधी उभारणी करण्यास ठेवींच्या रूपाने मदतीचा हात द्यावा. तर सभासदांनी आपले अपूर्ण भागांची रक्कम पूर्ण करावी. वारस नोंदी नियमित कराव्यात. वाढीव भाग खरेदी करून स्वनिधीस सहकार्य करावे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
ज्येष्ठ संचालक उद्धव वाघ यांनी सभेत सहभागी सभासदांचे स्वागत करून उसाची उपलब्धता, तोडणीच्या समस्यांबाबत संबोधित केले. पांडुरंग खेडकर, सुभाष अंदुरे, ज्येष्ठ नेते मधुकर काटे आदींसह देशातील दिवंगतांना आदरांजली वाहण्यात आली. सरव्यवस्थापक भास्करराव गोरे यांनी इतिवृत्त व अहवालाचे वाचन केले. लेखापाल गोपीनाथ म्हस्के यांनी ताळेबंद नफातोटा पत्रकांचे वाचन केले. कार्यकारी संचालक जालिंदर पवार यांनी विषयनिहाय सविस्तर माहिती विषद केली. उपाध्यक्ष रामकिसन काकडे यांनी आभार मानले. प्रशासकीय अधिकारी विनायक म्हस्के, रवींद्र महाजन, संचालक सुभाष ताठे, सुभाष बुधवंत, बाबासाहेब किलबिले, श्रीकांत मिसाळ, कारखान्याचे विविध खात्यांचे अधिकारी यावेळी हजर होते.