अहमदनगर : जिल्ह्यात चाचण्यांची संख्याही आता वाढत आहे. रोज सरासरी सहाशे ते सातशे चाचण्या होत आहेत. जिल्हा रुग्णालयातील चाचण्यांची संख्या कमी झाली असून, खासगी प्रयोगशाळेत होत असलेल्या चाचण्यांची संख्या सर्वाधिक आहे. चाचण्या घेतलेल्या रुग्णांपैकी २५ टक्के जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येत आहे. पूर्वी हेच प्रमाण १८ ते २० टक्के होेते. रविवारीही १४८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या सरासरी ५०ने वाढली आहे. रोज सरासरी आता १५० जण कोरोनाबाधित होत आहेत. १८ आणि १९ फेब्रुवारी या दोन्ही दिवशी मिळून जिल्ह्यात १,५२० चाचण्या झाल्या, तर रविवारी ५८६ जणांनी कोरोना चाचणी केली. रविवारी जिल्ह्यात १४८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत १९, रॉपिड अँटिजन ३१ आणि खासगी रुग्णालयांत ९८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये नगर शहर (४९), अकोले (३), जामखेड (१), कर्जत (१), कोपरगाव (१४), नगर शहर (१४), नेवासा (३), पारनेर (३), पाथर्डी (०), राहाता (७), राहुरी (२१),संगमनेर (१६), शेवगाव (४), श्रीगोंदा (५), श्रीरामपूर (५), इतर जिल्हा (२) येथील रुग्णांचा समावेश आहे.
रविवारी १३९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे सध्या ८५७ जणांवर उपचार सुरू आहेत. ही संख्याही दोन दिवसांत कमी झाली आहे. जिल्ह्यात चार दिवसांमध्ये एकाचाही मृत्यू झालेला नाही.
----
चाचण्यांची संख्या कमीच
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी लक्षणे आढळलेल्या लोकांच्या चाचण्या करण्याचा आदेश यंत्रणेला दिला आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २० जणांच्या चाचण्या करण्याबाबतही आदेश दिला आहे. मात्र, सध्या चाचण्या वाढविण्याबाबत अद्यापही यंत्रणा उदासीन असल्याचे दिसते आहे. संपूर्ण जिल्हयात एका दिवसात सरासरी सहाशे चाचण्या ही संख्याही कमीच असल्याचे दिसते आहे.