श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना हत्येची धमकी देणाऱ्या येथील संतोष गायधनी याला शहर पोलिसांनी अटक केली. जिल्हा पोलीस प्रमुखांनीही धमकीनंतर अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली.
शेत जमिनीच्या वारसा नोंदीमध्ये झालेला अन्याय तसेच ॲट्रॉसिटी कायद्याखाली अडकविण्याचा प्रयत्न झाल्याने अण्णा हजारे यांची १ मे या दिवशी हत्या करणार असल्याची धमकी गायधने याने दिली होती. त्याने बुधवारी सोशल मीडियावर तसा व्हिडिओ प्रसारित केला होता. आपण कुटुंबासमवेत अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन न्यायाची मागणी केली होती. मात्र अण्णा यांनी दखल घेतली नाही, असे गायधने याचे म्हणणे होते.
दरम्यान, प्रकाराची जिल्हा पोलिस यंत्रणेने तातडीने गंभीर दखल घेतली. बुधवारी रात्री गायधने याला त्याच्या निपाणीवाडगाव येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. श्रीरामपूर पोलिसांनी त्याला अटक करत कसून चौकशी सुरू केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनीही हजारे यांच्याशी या प्रकरणानंतर चर्चा केली. वैयक्तिक वादाकडे दुर्लक्ष केल्याने या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केली होती, असे यांना हजारे यांनी ओला यांना सांगितले आहे. राळेगणसिद्धी येथे नेहमीप्रमाणे सुरक्षा यंत्रणा कायम आहे.
निपाणी वाडगाव येथील गायधने हा व्यक्ती सतत सोशल मीडियावर सक्रिय असतो. आपल्यावरील अन्यायाची कैफियत मांडून तो सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करतो. नाशिक येथील एका आश्रमामध्ये नोकरीस असताना पैसे बुडविल्याचा आरोप त्यांनी तेथील काही लोकांवर नुकत्याच एका व्हिडिओ पोस्टद्वारे केला होता. फोनवरील संभाषणाच्या ऑडिओ क्लिप त्याने यापूर्वी पोस्ट केलेल्या आहेत. राजकीय नेते, चर्चेतील व्यक्ती यांच्या बद्दलही तो सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करत असतो. मात्र त्या प्रकरणांमध्ये गायधने याच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत.