कोपरगाव : पाच वर्षांपूर्वी गणेश विसर्जनादरम्यान शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी कोपरगाव शहरातील प्रगत शिवाजी रोड संयुक्त मित्र मंडळाच्या २४ कार्यकर्त्यावर दाखल असलेल्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधिश बी. एम. पाटील यांनी सर्वच २४ आरोपींची बुधवारी निर्दोष मुक्तता केली आहे. कोपरगाव शहरातील प्रगत शिवाजी रोड संयुक्त मित्रमंडळाच्या कार्यात्यांवर सन २०१८ साली गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये नियमाचे उल्लंघन करून विसर्जनाचे मार्गात अडथळा करून बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचा-यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा केल्याच्या आरोपावरून प्रगत शिवाजी रोड संयुक्त मित्र मंडळाच्या २४ कार्यकर्त्यांविरूद्ध विविध कलमाखाली कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून खटला सुरू होता.
या खटल्यात फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तपासी अधिकारी भरत नागरे, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. आरोपींतर्फे अॅड जयंत आत्माराम जोशी यांनी पोलिस यंत्रणेने आरोपींविरूद्ध राजकीय वादातुन गुन्हा दाखल केल्याचे, तसेच या प्रकरणातील साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिल्या. तसेच प्रथमदर्शनी शासकीय कामात अडथळा नसल्याचा युक्तिवाद करून आरोपींची मुक्तता करण्यात यावी असा युक्तीवाद केला.
सरकारी अभियोक्ता व आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकुन कोपरगाव न्यायाधिश बी. एम. पाटील यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींतर्फे अॅड जयंत जोशी यांनी कामकाज पाहिले. तसेच अॅड व्यंकटेश खिस्ते, अॅड वाय. एच. दाभाडे, अॅड एस. डी. मोरे, अॅड एस. ए. जानी यांनी कामकाज पाहिले.