अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन पेटल्याने ठिकठिकाणी नेत्यांना गावबंदी, उपोषण वाहनांची तोडफोड व फ्लेस फाडले जात आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील सर्व ठिकाणचे नेते, कार्यकर्त्यांचे अनधिकृत फ्लेक्स काढून टाकले आहेत. सोमवारी रात्री ९ वाजता मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सुरू केलेली ही मोहिम रात्री दीडपर्यंत सुरू होती. या कारवाईत एकूण २५० फ्लेक्स काढण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू असल्याने वातावरण संवेदनशील बनले आहे. अशा स्थितीत शहरात रस्त्यांवर ठिककठिकाणी आणि चौकाचाैकात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स बोर्ड लावण्यात आलेले होते. विशेषत: लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नेते, कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी यांचे हे फ्लेक्स होते. यात गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या सुभेच्छा तसेच वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले फ्लेक्स मोठ्या प्रमाणात होते. हे सर्व फ्लेस पथकाने काढून टाकले. मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख आदित्य बल्लाळ, आयुक्त निकत, क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.