अहमदनगर : कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गावरील सर्व्हिस रस्त्याने जाणारी मालवाहतूक पिकअप (एम एच १७ ए जे ५८३६ ) वाहनाचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे वाहन रस्त्याच्याकडेला असलेल्या विहिरीत कोसळले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. यात चालकाशेजारी बसलेल्या मदतनीसाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला.
गाडीचा ब्रेक फेल झाल्याची बाब चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने वाहनातून उडी मारली. मात्र त्याचा मदतनीस गाडीत होता. घटना स्थळी पोलीस दाखल झाले. वाहन विहिरीतून काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.
कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर हा अपघात झाला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. समृद्धी महामार्गाची रेस्क्यू टीम,महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल, अग्निशामक दल, कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी -कर्मचारी,आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना पाचारण करून गाडी विहिरीतुन काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.
रात्री १० वाजेच्या दरम्यान गाडी विहिरीतून बाहेर काढली. मात्र मदतनीसाला बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम सुरू होते. अखेर रात्री उशिरा वीस वर्षीय मदतनिसाचा मृतदेह विहिरीत सापडला.चालकाला संत जनार्दन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.