अहमदनगर: प्रशासकीय आणि राजकीय संभ्रमावस्थेत गुरुवारी (दि.२८) महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा पंचवार्षिक कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर आता आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची नगरविकास विभागाने मनपाचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबत नगरविकास विभागातील उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी आदेश जारी केले आहेत. त्यामुळे मनपात आता प्रशासकराज सुरू झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या पत्राच्या संदर्भानुसार गुरुवारी मनपाच्या सहाय्यक आयुक्तांनी पत्र काढत महापालिकेची मुदत संपुष्ठात आली असून यापुढील काळात कुठलीही सभा, बैठक घेता येणार नसल्याचे पत्र काढले. त्यामुळे नियोजित असलेली २८ डिसेंबरची स्थायी समितीची सभा आणि २९ डिसेंबरची महासभा रद्द झाली. दरम्यान प्रशासक म्हणून कुणाची नियुक्ती होणार? याबाबत मनपाच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. मनपात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमप्रसंगी मनपाचे प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची नियुक्ती असल्याची चर्चा रंगली होती. अखेर नगरविकास विभागाने आयुक्तच प्रशासक म्हणून कामकाज पाहणार असल्याचे पत्र काढल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.---