- चंद्रकांत शेळके अहमदनगर - मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोडीच्या घटना होत असल्याने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील बहुतांश बस बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. मंगळवारी ८० टक्के फेऱ्या बंद होत्या.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा तसेच राज्यातील काही भागांत एसटीवर दगडफेक करण्यात आली. तर काही ठिकाणी महामार्गावर आंदोलन सुरू असल्याने एसटीच्या फेऱ्या करण्यात अडचणी येत आहेत. सोमवारी केवळ बीड जिल्ह्यात जाणाऱ्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु, त्यानंतरही अनेक ठिकाणी तोडफोड झाल्याने खबरदारी म्हणून एसटीच्या अहमदनगर विभागीय कार्यालयाने मंगळवारी बहुतांश ठिकाणच्या फेऱ्या रद्द केल्या. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
सर्वच आगाराच्या फेऱ्या बंद?जिल्ह्यात एसटी महामंडळाचे ११ आगार आहेत. या सर्व आगारांच्या लांब पल्ल्याच्या बस मंगळवारी बंद होत्या. केवळ ग्रामीण भागातील काही फेऱ्या सुरू होत्या. आंदोलनाचा अंदाज घेऊन आगारप्रमुख बस सोडण्याचा निर्णय घेत होते.
प्रवासी, विद्यार्थ्यांचे हालसध्या विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे विविध शाळांत जाणारे तसेच ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे बसअभावी हाल झाले. काही ठिकाणी बस सुरू होत्या, असे प्रशासनाचे म्हणणे असले, तरी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे हाल झाले. अनेक विद्यार्थी दुपारी पेपर सुटल्यानंतर बसची वाट पाहत होते. याशिवाय दिवाळी खरेदीसाठी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लांब पल्ल्याच्या काही फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असल्याने त्या बस सुरू आहेत. बीड, छ. संभाजीनगर तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जाणाऱ्या बसवर परिणाम झाला आहे. आंदोलनाची स्थिती पाहून बस सोडण्याबाबत आगारप्रमुखांना सांगण्यात आले आहे.-मुकुंद नगराळे, प्रभारी विभाग नियंत्रक
तारकपूर स्थानकात गाड्यांना आश्रयनगर शहरातील तीन बसस्थानकांपैकी माळीवाडा व स्वस्तिक बसस्थानकात एकही बस उभी नव्हती. अधूनमधून एखादी बस सुरू होती. याचा फायदा घेत स्थानकात अनेक खासगी वाहने प्रवासी भरत होते. शिवाय बंद असलेल्या अनेक बस तारकपूर बसस्थानकात उभ्या केलेल्या होत्या.