योगेश गुंड, लोकमत न्यूज नेटवर्क, केडगाव (जि. अहमदनगर): नगर तालुक्यात विविध भागात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. काही गार्वात तर दहा ते बारा दिवसांतून एकदाच तेही अर्धा ते एक तास पाणी मिळते. गेल्या महिन्यापासून अनेक गावांतील विहिरी कोरड्या पडल्यामुळे पाण्यासाठी गावोगावी ग्रामस्थांना रोज भटकंती करावी लागत आहे.
तालुक्यातील बहुतांशी गावांत ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरी कोरड्या पडल्याने नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद आहे. काही ठिकाणी एखाद्या वस्तीवरील हातपंपास थोडेफार पाणी आहे. तेथे पाणी भरण्यास ग्रामस्थांची झुंबड उडत आहे. सध्या याही हातपंपांची पाणीपातळी खालावल्यामुळे आता पाण्याच्या शोधात शिवारभर भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. विहिरीतील थोडेफार असलेले पाणी महिला मुलांना कठड्यावर उभे राहून दोरीच्या साह्याने शेंदावे लागत आहे.
जलसंधारणाची कामे केली, पण पुरेसा पाऊसच नाही
विविध गावात ग्रामस्थांती एकजुटीने जलसंधारणाची कोट्यवधीची कामे श्रमदानातून केली आहेत.मात्र, पुरेसा पाऊस न झाल्याने पातळी सर्वच ठिकाणी खालावली आहे. आता इलेक्शन झाले. नेते मंडळींनी तातडीने टैंकर सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
पाझर तलावाला भेगा
पाझर तलावात जमिनीला पाण्याअभावी भेगा पडल्यामुळे सध्या जनावरांच्या व ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची चिकट अवस्था निर्माण झाली आहे. अनेक जण एक-दोन किलोमीटर डोक्यावरून किंवा वाहनातून पाणी आणून जनावरांची तहान भागवत आहेत.
घोसपुरी - बुऱ्हाणनगरचे पाणी आठवड्यातून एकदाच
घोसपुरी व बुहाणनगर योजनेद्वारे नगर तालुक्यातील ६० गावांची तहान भागवली जाते. मात्र, सध्या या योजनांमधून आठ- दहा दिवसांनी पाणी मिळते. सध्या तालुक्यात १८ गावांमध्ये टैंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.