संगमनेर : देशाची लोकशाही टिकवायची असेल तर तत्वनिष्ठता असणे गरजेचे आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असणारे लोक सत्तेत आल्यावर पवित्र कसे होतात? हा मोठा प्रश्न आहे. पक्षांतर बंदी कायद्याचा फोलपणा हा आता उघड झाला आहे. पक्षाच्या विरोधात काम केले तर आमदारकी रद्द. असा कायदा होणार आता गरजेचे असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो म्हणाले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भूमिका व पुढील धोरण जाहीर करण्यासाठी डॉ. कांगो यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.२२) संगमनेर शहरातील दुर्वे नाना सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य तुकाराम भस्मे, राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे, सहसचिव प्रा. राम बाहेती, जिल्हा कौन्सिल सदस्य ॲड. ज्ञानदेव सहाणे, माधव नेहे, दशरथ हासे, भास्कर पावसे आदी यावेळी उपस्थित होते.
समान नागरी कायदा हा फक्त हिंदू मुस्लिम प्रश्न नाही. या कायद्यात जैन, आदिवासी यांची सुद्धा या निमित्ताने चर्चा होते आहे.आजही अनेक स्त्री आणि पुरुष लग्न न करता एकत्र राहतात. समलिंगी विवाहाचे काय करायचे, हा सुद्धा प्रश्न आहे. भाजपाची ही सगळी दुटप्पी भूमिका असून कुठलाही मसुदा न देता केवळ बोंबाबोंब करायची हा राजकारण करायचा भाजपाचा प्रयत्न असल्याचेही डॉ. कांगो म्हणाले.