संगमनेर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये होणाऱ्या प्रवेशांची तसेच येथून मागील झालेल्या प्रवेशांची चौकशी व्हावी. कारण आरटीई प्रवेशात शासनाची फसवणूक होत आहे. तसेच शासनाकडून सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मिळणारी आरटीई प्रतिपूर्ती रक्कम शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करण्यात आली. संगमनेरात विविध खासगी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना नुकतेच निवेदन दिले.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, व्यंकटेश एज्युकेशन सोसायटीच्या स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या संचालिका डॉ. संज्योत वैद्य, सुमेरू एज्युकेशन सोसायटी संचलित श्री. श्री रविशंकर विद्या मंदिराच्या अध्यक्षा स्वाती शाह, के. एम. बी. एस. निघुते मेमोरियल फाउंडेशनच्या लोटस इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. नीलिमा निघुते, कै. शंकरराव शेवाळे पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. माणिकराव शेवाळे, सचिव प्रा. विठ्ठल शेवाळे यांसह आकाश नागरे, स्वाती कोयते आदी यावेळी उपस्थित होते.