अरुण वाघमोडे, नेवासा (अहमदनगर): कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. गुन्हेगार पोलिसांच्या नजरेत राहावेत, म्हणून जुन्या गुन्हेगारांचे हिस्टरी सीट पुन्हा एकदा ओपन करण्याचे पोलीस ठाण्यांना आदेश देण्यात आले असल्याचे नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी.जी. शेखर पाटील यांनी सांगितले.
वार्षिक निरिक्षण संदर्भात शेखर यांनी मंगळवारी नेवासा पोलीस ठाण्याला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर उपस्थित होते. शेखर म्हणाले गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत शिरजोर होऊ दिले जाणार नाही. यासाठी तडीपारीच्या व झोपडपट्टी कायद्यातंर्गत गुन्हेगारीच्या प्रकरणांना ताबडतोब मंजुरी देऊन विक्रमी संख्येने गुन्हेगार तडीपार करण्यात आले आहेत.
आदेश देताना प्रत्येक पोलीस ठाण्यात किमान दहा जुने गुन्हेगारांचे हिस्टरी सीट पुन्हा ओपन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गांजा, अफू, चरस व त्यापेक्षाही मोठे ड्रग विक्रीची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिसांना कळवावे, त्यासाठी ११२ नंबर वर माहिती दिली तरीही त्वरित कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. नेवासा तालुक्यातील पाथरवाला येथील वेठबिगारी प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह विशेष पथक तयार केले असल्याने लवकरच आरोपींना अटक होईल, अशी माहिती शेखर यांनी दिली.