सचिन धर्मापुरीकर, कोपरगाव (जि. अहमदनगर): तालुक्यातील पुणतांबा फाटा ते झगडे फाटा दरम्यान दुचाकी वाहन आडवून चाकुच्या धाकावर २० हजार रूपयांची लुट करणाऱ्या दोन आरोपींना कोपरगाव तालुका पोलिसांनी मालेगावर येथून अटक केली.
घटनेबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, दि. २५ एप्रिल २०२३ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पुणतांबा फाटा ते झगड़े फाटा जाणाऱ्या रस्त्यावरून डॉ. सुधीर बाळासाहेव खंडीझाेड (वय २४, रा. सोनेवाडी ता. कोपरगाव) हे त्यांच्या मोटार सायकलवर घरी जात होते. तेव्हा चांदेकसारे शिवारात पल्सर मोटार सायकलवर आलेल्या दोन अज्ञान इसमांनी खंडीझोड यांची दुचाकी अडवुन त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील मोबाईल, रोख रक्कम डेबीट कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स असा एकुण वीस हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता. त्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात चोरीला गेलेल्या मोबाइल हॅण्डसेटचे तांत्रीक विश्लेषण करुन, गोपनीय बातमीदारामार्फत तपास करण्यात आला. तेव्हा अमोल राजेंद्र काकळीज (वय २५, रा. मालेगाव कॅम्प, जि. नाशिक) याचा सक्रीय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यास पोलीस पथकाने मालेगाव येथुन अटक केली. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरलेल्या मुद्देमालापैकी वीस हजार रूपयांचा मोबाइल काढून दिला आहे. लुट करताना सोबत असलेल्या अन्य एकाचे नाव त्याने सांगितले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कुसार, सहाय्यक फौजदार सुरेश गागरे, पो.कॉ. रशिद शेख, पो.कॉ. अनिस शेख रोहित आरखडे, अमोल फटांगरे, चालक पां. ना. साळुंके, मेढे व आकाश बहिरट, सायबर सेल श्रीरामपूर यांचे पथकाने केली आहे.