प्रमोद आहेरशिर्डी : शिर्डीच्या साई मंदिरातील मूर्तीची दिवसेंदिवस झीज होत आहे. या मूर्तीचा अत्याधुनिक थ्रीडी स्कॅनिंगद्वारे डाटा संरक्षित केला तर पुढच्या शेकडो पिढ्यांना किमान आज दिसते तशी साईमूर्ती बघता येईल, अशी माहिती मूर्तितज्ज्ञांकडून मिळत आहे. साईसमाधी मंदिरातील सध्याची मूर्ती मुंबईचे शिल्पकार भाऊसाहेब ऊर्फ बाळाजी तालीम यांनी बनवलेली आहे. सजीव भासणाऱ्या या मूर्तीची १९५४ साली प्राणप्रतिष्ठा करण्यात आली़ इटालियन मार्बलची ही मूर्ती दिवसेंदिवस झिजत आहे.
मूर्तीच्या दाढी, मिशांचे केस, हातापायांची नखे सध्याच झिजली आहेत. या मूर्तीची काळजी घेतली नाही तर भविष्यात ही मूर्ती विठ्ठलाच्या मूर्तीसारखी गुळगुळीत होण्याची भीती मूर्तिकार तालीम यांनी मूर्तीच्या पंचविसाव्या वर्धापनदिनीच व्यक्त केली होती.
लोकमत’ने २००६ सालीच वेधले लक्ष मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचे माजी संचालक पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांनीही याबाबत संस्थानला वारंवार सूचना केल्या होत्या.२००६ साली ‘लोकमत’ने गोरक्षकरांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संस्थानने मूर्तीच्या स्नानासाठी अतिगरम पाणी, दही-दुधाचा वापर कमी केला.मार्बल नैसर्गिकदृष्ट्या थंड असल्याने गरम पाण्याने ते ठिसूळ होते. दही-दुधात असलेल्या आम्लाचाही मूर्तीवर विपरीत परिणाम होतो, या बाबींकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते.मूर्तीला रोज स्नान घालण्यास व टॉवेलने पुसण्यास गोरक्षकर यांनी मनाई केलेली होती. त्याकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नाही.
प्रत्येक मूर्ती, वस्तूचे एक आयुष्य असते. कालांतराने मूर्तीची झीज, नैसर्गिक आपत्तीमुळे तुटफूट झाल्यास तिचे सौंदर्य कमी होते. या पार्श्वभूमीवर मूर्तीचे थ्रीडी स्कॅनिंग करून मूर्तीचा डाटा संरक्षित करता येतो. भविष्यात ही मूर्ती बदलायची असल्यास या डाटाचा वापर करून हुबेहूब आज दिसणारी मूर्ती कोणत्याही आकारात बनवता येईल. - प्रशांत बंगाळ, संतोष चव्हाण,संचालक, कार्व टेक, पुणे
मूर्तीची झीज होत आहे़, अशी मूर्ती पुन्हा होणार नाही, तिची काळजी घ्यायला हवी. - प्रकाश खोत, माजी प्रमुख, साई मंदिर