Karjat Murder Case: कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील ऊसतोडणी कामगाराच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने प्रियकर व भावाच्या मदतीने पत्नीनेच पतीचा खून केला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दत्तात्रय वामन राठोड (रा. जमशदपूर, ता. पुसद, जि. यवतमाळ), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला पुण्यातून, तर मयताची पत्नी व तिच्या भावाला यवतमाळ येथून अटक केली आहे. याप्रकरणी संतोष शिवाजी काळे (वय ४४, रा. पळसदे, ता. इंदापूर, जि. पुणे ), ललिता दत्तात्रय राठोड (वय २५, रा. जमशदपूर, ता. पुसद, जि. यवतमाळ), प्रवीण पल्हाद जाधव (वय ३३, रा. सिंगर, ता. डिग्रस, जि. यवतमाळ), अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.
मयत दत्तात्रय राठोड यांच्यासह त्यांची पत्नी ललिता आणि तिचा भाऊ प्रवीण जाधव, हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. ते ऊस तोडणीसाठी कर्जत तालुक्यात आले होते. ऊसतोडणीचे काम करत असताना ललिताची संतोष काळे याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांच्यातील प्रेमसंबंधावरून दत्तात्रय राठोड पत्नी ललितावर संशय घेऊन मारहाण करत असे. बुधवारी (दि. ९) संतोष काळे हा ललिताला भेटण्यासाठी गेला होता. याचवेळी ललिताचा पतीही तिथे आला. त्याने याच कारणावरून पत्नीला मारहाण केली. या रागातून ललिता, तिचा प्रियकर संतोष आणि भाऊ प्रवीण, अशा तिघांनी दत्तात्रय राठोड यास मारहाण करत गळा दाबून ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रात्रभर कोपीत ठेवला. दुसऱ्या दिवशी ९ जानेवारी रोजी सकाळी संतोष त्याची कार घेऊन आला. त्याने ललिताचा भाऊ प्रवीण याच्या मदतीने मृतदेह कारमध्ये घालून मिरजगाव शिवारात एका शेतातील खड्ड्यात अर्धवट अवस्थेत पुरला.
मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने ठेचला. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर ललिता व तिचा भाऊ प्रवीण जाधव हे गावाकडे निघून गेले, तसेच मुख्य आरोपीही घटना घडली तेव्हापासून फरार होता. त्याला पोलिसांनी पुणे येथून अटक केली. हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, अनंत सालगुडे, बबन मखरे, विश्वास बेरड आदींच्या पथकाने पुणे पोलिसांच्या मदतीने उघड केला.
संतोष काळेला पकडताच झाला उलगडा
तांत्रिक विश्लेषणात सदरचा गुन्हा संतोष काळे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याचे समोर आले. त्याचा शोध घेत असताना तो पुण्यात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले. त्यामुळे खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला. त्याने प्रेमात अडसर ठरत असल्याने राठोड याचा खून केल्याची कबुली दिली.
खळगाव शिवारात आढळला मृतदेह
मयत दत्तात्रय राठोड यांचा मृतदेह १० जानेवारी रोजी कर्जत तालुक्यातील खळगाव शिवारात आढळून आला होता. यामुळे परिसरात खळबळ उडाली. सुरुवातीला मृतेदहाची ओळख पटत नव्हती. पोलिसांनी आजूबाजूच्या नागरिकांकडे चौकशी केली, मृतदेहाची ओळख पटली. सदरचा मृतदेह हा दत्तात्रय राठोड यांचा असल्याचे समोर आले.