अहमदनगर- राज्यात सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने डिसेंबर २०२०मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातीवाचक वस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यात विशेषत: ग्रामीण भागात काही वस्त्यांना जातीवाचक नावे दिल्याचे दिसून येते. अशी जातीवाचक नावे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नाहीत, ही बाब विचारात घेऊन सरकारने ही नावे बदलण्याचा निर्णय घेतला. त्या वस्त्यांना आता समतानगर, भीमनगर, ज्योतीनगर, क्रांतीनगर अशा विविध महापुरुषांची किंवा तत्सम नावे देण्याचे शासनाच्या विचाराधिन आहे.
शासनाच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागात कोणत्या वस्त्यांना अशी जातीवाचक नावे आहेत, ही माहिती घेण्यात आली. त्यानुसार ही नावे बदलण्याबाबत संबंधित वस्तीवरील ग्रामस्थ, गावचे पदाधिकारी यांनी चर्चा करून ग्रामसभेतही त्यावर मते मागवली गेली. ज्या वस्त्यांची नावे बदलायची आहेत, अशा १००७ वस्त्या असल्याचे समोर आले. त्यानुसार तसा ठराव ग्रामसभेत करून तो पंचायत समिती व तेथून जिल्हा परिषदेकडे मागविण्यात आला. आतापर्यंत १००७पैकी ६५४ ठराव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. उर्वरित ठरावही येत्या महिनाभरात प्राप्त करून हे सर्व ठराव जिल्हा परिषदेकडून विभागीय आयुक्त व तेथून शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत.
शासनाच्या निर्णयानुसार जातीवाचक वस्त्यांची नावे बदलण्याबाबत आदेश आहेत. जिल्ह्यात अशा एकूण १००७ वस्त्या आहेत. त्यांची नावे बदलण्याबाबत ग्रामपंचायतींचे ठराव घ्यायचे आहेत. आतापर्यंत ६५४ ठराव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. उर्वरित ठरावही येत्या महिनाभरात प्राप्त होतील. नंतर ते एकत्रित शासनाकडे पाठवले जातील.
- राजेंद्र क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.
शासनाने आधी वस्त्यांचे सर्वेक्षण करून लोकसंख्या निश्चित करावी. त्यानंतर जातीवाचक वस्तीचे नाव बदलून सर्वसमावेशक नाव द्यावे. ज्या नावावरून धार्मिक किंवा जातीय तेढ, गावात वाद-विवाद पुन्हा निर्माण होणार नाही. शासनाचा नाव बदलण्याचा उद्देश सफल झाला पाहिजे.
- आबासाहेब सोनवणे, जिल्हाध्यक्ष, सरपंच परिषद