‘विधानसभाध्यक्षांनी निरपेक्ष बुद्धीने निर्णय द्यावा’; काय म्हणतात विविध राजकीय पक्षांचे नेते?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 07:19 AM2023-05-12T07:19:38+5:302023-05-12T07:21:11+5:30
विधानसभेचे अध्यक्षपद कोणत्याही पक्षाशी निगडित नसून स्वतंत्र आणि स्वायत्त असते.
संगमनेर (जि. अहमदनगर) : विधानसभेचे अध्यक्षपद कोणत्याही पक्षाशी निगडित नसून स्वतंत्र आणि स्वायत्त असते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वायत्त पद्धतीने आणि निरपेक्ष बुद्धीने निर्णय द्यावा, अशी अपेक्षा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
अखेर भरत गोगावलेंना मिळणार तरी काय? पक्षप्रतोद पदही गेल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय
राज्य सरकारबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर भाष्य करताना थोरात म्हणाले की,पक्षांतर बंदीचा कायदा यासाठी केला आहे की, कोणीही फोडाफोडी करू नये. मूळ शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी नि:पक्षपातीपणे निर्णय घ्यावा.
‘सर्वोच्च न्यायालयाने संवैधानिक पदावर असलेले राज्यपाल, विधिमंडळ अध्यक्षांवर ओढलेले ताशेरे यावरून हे सरकार बेकायदा पद्धतीने अस्तित्वात आले आहे. यामुळे सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने नैतिकतेच्या आधारावर तत्काळ राजीनामा दिला पाहिजे,’ अशी ठोस मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
शिंदे सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेले आहे. आमदारांच्या अपात्रतेची कारवाई विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलेली आहे. सुनिल प्रभू यांनी बजावलेल्या व्हीपचे उल्लंघन झालेले आहे, असे ठाकरे गटाचे आमदार ॲड. अनिल परब म्हणाले.
हे सरकार पूर्णपणे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. शिंदे आणि फडणवीस यांनी उगाच पेढे वाटू नये. आपण बेकायदेशीर सरकारचे प्रतिनिधीत्व करता. नैतिकता असेल आणि खोक्यांचे पाप धुवायचे असेल तर, सरकारने राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
शिंदे सरकार जरी वाचले असले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नोंदवले आहे. तर राज्याला स्थिर सरकार मिळण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असून हा लोकशाहीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. कोर्टाने दिलासा दिल्याने मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला धोका नाही. खैरे पाण्यात देव बुडवून बसले आहेत. त्यांना म्हणा तुम्ही अशीच यज्ञ, पुजा करत बसा,अशी प्रतिक्रिया रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी व्यक्त केली.
आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, विरोधक आता ओरडत सुटले आहेत. संजय राऊत यांना
गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका म्हणजे महाराष्ट्र शांत राहील. आजच्या निकालाने सरकार स्थिर झाले आहे. त्यामुळे कोर्टाचे धन्यवाद. विधीमंडळाचे पावित्र्य न्यायालयाने शाबूत ठेवले आहे
आम्हाला कोर्टाचा निर्णय मान्य आहे. कसे बेकायदेशीर ठरवलं आहे ते आमचे विधीतज्ज्ञ पाहतील आणि जे काही ठरवतील त्यात आम्हाला समाधावे मानावं लागेल, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी नोंदवली.
सर्वोच्च न्यायालयान गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवलेली नाही. न्यायालयाने प्रक्रियेचे पालन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आम्ही प्रक्रियेचे पालन करून गोगावले यांची पुन्हा नियुक्ती करू. अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
नैतिकतेवर द्या राजीनामा...
सर्वाेच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर दिलेल्या निर्णयानंतर राजकीय नेत्यांकडून वेगवेगळी मते मांडली आहेत. नैतिकतेच्या आधारे शिंदे-फडणवीस सरकारने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. तर सरकार उलट स्थिर झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला काेणताही धाेका नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शिंदे गटाच्या नेत्यांनी दिल्या आहेत.