संजय ठोंबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, चिचोंडी पाटील (जि. अहमदनगर) : बाजार समितीत सध्या ज्वारीला प्रतिक्विंटल २५०० ते चार हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. मात्र, घटलेल्या उत्पादनामुळे यातून उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे परिसरातील ज्वारी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे रब्बीतील ज्वारी उत्पादनातही मोठी घट झाली. शेतकऱ्यांचे खर्च आणि उत्पादनाचे गणित बिघडले. एकरी जिरायतात दोन ते तीन क्विंटल व बागायतात पाच ते सहा क्विंटल ज्वारीचे उत्पादन मिळाले. शेतकऱ्याची स्वत:ची मेहनत वगळता एकरी सरासरी २१ हजार रुपये खर्च आला. उत्पादनाचा विचार करता ज्वारी, कडबा विक्रीतून सरासरी १८ हजार रुपये शेतकऱ्याला एकरी मिळाले. त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती काहीच पैसे मिळाले नाहीत. यामध्ये काढणीच्या वेळी जाणवलेल्या मजूर टंचाईने खर्चात वाढ केली.
ज्वारीचा एकरी उत्पादन खर्च (रुपयांत)
- नांगरट २,०००
- काकाऱ्या १,०००
- पाळी १,०००
- पेरणी १,५००
- बियाणे ५००
- खत १,५००
- खुरपणी २,५००
- काढणी ६,०००
- कणसे मोडणी १,५००
- मळणी खर्च ३०० रुपये प्रतिक्विंटल
मिळणारे उत्पादन/ उत्पन्न...
- एकरी जिरायत ३ क्विंटल, बागायत ६ क्विंटल
- ज्वारी भाव - २,५०० ते ४,००० रुपये
- सरासरी - ३,२००
- ज्वारी विक्रीतून मिळणारे पैसे : १२,८००
- कडबा - ३००-४०० पेंढ्या
- भाव - शेकडा १,००० ते १,५००
- यातून मिळतात ६०,०००
- ज्वारी व कडबा विक्रीतून एकूण मिळालेली रक्कम : १८,८००
- एकरी झालेला खर्च : २१,०००
- एकरी उत्पादन घट : २,५००