अहमदनगर : नगर अर्बन बँकेच्या सन 2014 ते 19 या काळातील संचालकांचे सभासदत्व रद्द करणे तसेच याच काळातील नव्याने निवडून आलेल्या संचालकांचे पद रद्द करण्याबाबतचा ठराव शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हात वर करून नामंजूर करण्यात आला. यावेळी सभासदांनी नामंजूर चे फलक झळकवीत एकच गोंधळ केला.
नगर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.पी. साळवे यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी एका मंगल कार्यालयात सर्व साधारण सभा पार पडली. सभेसमोर सन 2014 ते 19 या काळातील संचालकांचे सभासदत्व रद्द करणे तसेच याच काळातील संचालक राहिलेले सात जण पुन्हा संचालक म्हणून निवडून आलेले आहेत त्यांचे पद रद्द करणे असे दोन विषय होते. हे दोन्हीही विषय हात वर करून बहुमताने नामंजूर करण्यात आले.
सभेच्या सुरुवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सभेचे अध्यक्ष पद बँकेचे संचालक ईश्वर बोरा यांच्याकडे सुपूर्त केले. त्यानंतर प्रत्यक्ष सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. सभेचे अध्यक्ष बोरा यांनी विषय पत्रिकेतील सन 2014 ते 19 या काळातील संचालकांचे सभासदत्व रद्द करण्याबाबत उपस्थित सभासदांकडून मध्ये मागविली. त्यावर उपस्थित असलेल्या सभासदांनी नामंजूर चा फलक झळकवीत विषय नामंजूर करण्याची मागणी केली.
त्यानंतर विषय क्रमांक दोन सन 2019 14 ते 19 या काळातील जे संचालक राहिले. ते सध्याच्या म्हणजे 2021 ते 26 या काळासाठी पुन्हा संचालक म्हणून निवडून आलेले आहेत, अशा संचालकांची संख्या सात असून, त्यांचे संचालक पद व सभासद रद्द करण्याबाबतही मते मागविण्यात आली. त्यावेळीही सभासदांनी हात वर करून विषय नामंजूर करण्याची जोरदार मागणी केली. त्यामुळे सभेच्या अध्यक्षांनी दोन्ही विषय ना मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा केली.