अहिल्यानगर : संविधान बदलणार नाही, कोणालाही बदलू देणार नाही. घटना बदलण्याचे पाप काँग्रेसने केले. त्यांनीच घटना बदलून आणीबाणी लादली आणि आता आमच्यावर आरोप करतात. चोराच्या उलट्या बोंबा अशी त्यांची स्थिती आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
जिल्ह्यातील शेवगाव आणि कर्जत-जामखेड या मतदारसंघांतील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी दुपारी त्यांच्या शेवगाव आणि मिरजगाव (ता. कर्जत) येथे सभा झाल्या. त्यावेळी ते बोलत होते.
गडकरी म्हणाले, काँग्रेसने शेतकरी, मजुरांकडे लक्ष दिले नाही. शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. काँग्रेसच्या काळात आरोग्य, रस्ते, शेती या बाबतीत गावे मागासलेलीच राहिली. भाजपच्या काळात ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ते झाले. जे पंडित नेहरू यांना करता आले नाही, ते रस्त्यांचे काम अटल बिहारी वाजपेयी यांनी केले, असेही ते म्हणाले. गावे समृद्ध झाली पाहिजेत. देशाचा विकास करण्यासाठी केवळ पैशांची गरज नाही तर योग्य नेतृत्त्व, इमानदारी, योग्य नीती असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
स्मार्ट सिटीप्रमाणे स्मार्ट शेतकरी गरजेचा
- नाशिकमधील बागलाण मतदारसंघातही गडकरी यांची प्रचार सभा झाली. स्मार्ट सिटीबरोबरच आता स्मार्ट शेतकरी गरजेचा आहे. शेतकरी अन्नदाता नव्हे तर तो ऊर्जादाता, इंधनदाता करण्यासाठी महायुतीचे शासन कटिबद्ध आहे असे सांगत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
- या पक्षाने चुकीची आर्थिक धोरणे राबविली. ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष केले. शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. परंतु, शेतकरी कर्जातच जन्मतो आणि त्यातच मरतो. हे सर्व संपवण्यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्नशील आहे, असे गडकरी म्हणाले.