कोपरगाव (जि. अहमदनगर) : शहर व परिसरातून दुचाकी चोरून त्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे विक्री करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला कोपरगाव शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील दुचाकी विकत घेणारे तीन जणही पोलिसांच्या ताब्यात आहेत.
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दि. २४ मे रोजी सागर धनिशराम पंडोरे (रा. ब्राम्हणगाव ता. कोपरगाव) यांनी त्यांची मोटार सायकल चोरी गेल्याची तक्रार दिली होती. सदर गुन्हयाचा तपास सुरु असताना पोलीस उप निरीक्षक रोहीदास ठोंबरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली की, कोपरगाव येथून चोरीस गेलेले वाहने ही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर भागात विकलेली आहे. या माहीतीच्या आधारे कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पथक हे सिन्नर येथे गेले. तेथे संशयीत गणेश जेजुरकर यास ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे दोन साथीदार दिनेश राजेंद्र आहेर (वय ३०, रा. ब्राम्हणगाव ता. कोपरगाव) व अजित कैलास जेजुरकर (वय २४, रा. ब्राम्हणगाव ता. कोपरगाव) यांच्या मदतीने मोटारसायकल चोरल्याचे सांगीतले. दोन्ही संशयितांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींकडे मोटार सायकल चोरीबाबत चौकशी केली असता, त्यांनी पाच मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली.
वरील आरोपी यांनी चोरलेल्या दुचाकी शिरपुर (जि. धुळे) येथे विकल्याचे समोर आले. त्यानंतर दुचाकी विकत घेणाऱ्या प्रविण सुका कोळी (वय ३२) , प्रमोद झुंबरलाल कोळी (वय २३) व हर्षल राजेंद्र राजपुत (वय २३, तिनही रा. उपरपिंड ता. शिवपुर जि. धुळे) यांना ताब्यात घेवुन त्यांनी विकत घेतलेल्या मोटार सायकल जप्त केल्या. या गुन्ह्यात एकुण सहा आरोपी अटक केली आहे. त्यांचेकडुन चोरलेल्या पाच मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींकडुन मोटारसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पो. स. ई. रोहीदास ठोंबरे, पो.स.ई भरत दाते, पोहेकॉ डी. आर. तिकोने, ए.एम. दारकुंडे, महेश गोडसे, जालिंदर तमनर, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर भांगरे, विलास मासाळ, एम.आर. फड, बाळु धोंगडे, राम खारतोडे, जि.व्ही. काकडे यांनी केली आहे.