बारामती- काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती, असाच काहीसा अनुभव जंकशन (ता. इंदापूर ) येथील वृद्ध जोडप्याला आला. या दाम्पत्याची ब्रेक निकामी झालेली दुचाकी एका युवकाने पळत जाऊन धरल्याने हे वृद्ध पती-पत्नी सुखरूप बचावले. या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला.
रियाज मुलाणी असे या धाडसी युवकाचे नाव आहे. अवघ्या 17 वर्षांचा रियाज मुक्त विदयापीठातून शिक्षण घेत आहे. मंगळवारी (दि. 22) नेहमीप्रमाणे रियाज घरातील कामकाजामध्ये कुटुंबियांना मदत करत होता. याच वेळी घराच्या समोरील रस्त्यावरून एक वृद्ध दाम्पत्य टीव्हीएस लुना या दुचाकीवरून ओरडत येत असल्याचे त्याला दिसले. गाडीचे ब्रेक लागत नाहीत. आम्हाला वाचवा, अशी हाक ते जोडपे देत होते. हे रियाजच्या निदर्शनास आले. वेगात असणारी दुचाकी थांबवायची कशी? असा विचार सुरुवातीला रियाजच्या मनात आला मात्र दुचाकीच्या मागे पळत रियाजने दुचाकीचे कॅरेज घट्ट धरले. दुचाकी थांबवली. रियाज च्या या प्रसंगावधानामुळे या वृद्ध दाम्पत्य बचावले.
मी घराच्या बाहेर साफसफाई करत होतो. एवढ्यात समोरून मला दुचाकीवरून वृद्ध जोडपे येताना दिसले. गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत असे ते सांगत होते. मला त्या क्षणी जे सुचले ते मी केले. पळत जाऊन गाडीचे कॅरेज मागून घट्ट धरले. व गाडी थांबवली, अशी प्रतिक्रिया रियाजने दिली आहे.