विभासकुमार महतो यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, चौधरवाडी शिवारातील टॉवर क्रमांक १०२ ते १०४ ची ६४० चौरस एम.एम. जाडीची ॲल्युमिनिअम तार १५ ते १६ मेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असून चोरीस गेलेल्या तारेची किंमत ३५ हजार असल्याचे म्हटले आहे. यावेळी तेथील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचेही नुकसान केल्याचे दाखल तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून आश्वी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिंदे करत आहेत.
दरम्यान, ॲल्युमिनिअम तार चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी येथील शेतकरी बेबीताई वर्पे यांच्या गट नं - ८५/१ या शेतातील चार वर्षे वय असलेल्या ५० सीताफळांच्या झाडांचे मोठे नुकसान केले आहे. वार्षिक दीड ते दोन हजार उत्पन्न देणाऱ्या झाडांचे नुकसान झाल्याने या शेतकऱ्याचे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले असून त्याची भरपाई कोणाकडे मागायची, असा पेच आता या शेतकऱ्यापुढे उभा राहिला आहे.