कोपरगाव : तालुक्यात सुरु असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या भरावासाठी देर्डे-चांदवड येथील शेतातून माती व मुरुमाची चोरी झाली आहे.
या प्रकरणी दीपक मुनोत (रा.शिवाजीनगर, पुणे ) यांच्या फिर्यादीवरून ठेकादार कंपनी गायत्री कन्स्ट्रक्शन्स विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी (१६ जून) रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक मुनोत हे नोकरीनिमित्त पुण्यात राहतात. त्यांची कोपरगाव तालुक्यातील देर्डे- चांदवड येथे मालकीची एकत्रित ३ एकर १५ गुंठे जमीन आहे. या परिसरात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे.
गायत्री कन्स्ट्रक्शन्स कंपनीचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक, व्यवस्थापकीय संचालक, प्रकल्प प्रमुख ताताराव, पितांबर जेना यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, जेसीबी चालक यांनी संगनमताने शेतामध्ये बेकायदा प्रवेश करून सुमारे ४० फूट खोल खोदकाम केले आहे.
कंपनीने त्यांच्या शेतात विनापरवाना खोदकाम करून सुमारे ५४ लाख घनफूट माती आणि मुरूम चोरून नेली. शेतातील विहीर बुजविण्यात आली. पिकांची नासधूस झाली असून यापुढे शेती पिके घेण्यास उपयुक्त राहिली नसल्याचे मुनोत यांनी फिर्यादीत म्हटले आहे.