दहिगावने : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील पोलीस दूरक्षेत्राशेजारीच चोरांनी डल्ला मारला. मोबाईल शॉपीचे शटर उचकटून दुकानातील ३५ हजार रुपये, एक लॅपटॉप, दोन मोबाइल व मोबाईल ॲक्सेसरीज असा जवळपास एक लाखांचा ऐवज चोरून नेल्याची माहिती दुकान मालक योगेश वाबळे यांनी दिली. मंगळवारी (दि.२) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळत नसल्याने योगेश वाबळे या तरुणाने शहरटाकळी बस स्टँडवरील मुख्य चौकात स्वराज इलेक्ट्रीकल्स ॲण्ड मोबाईल शॉपी हे दुकान सुरू केले. मंगळवारी योगेश दिवसभराचे काम आटोपून नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेला. याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. दुकानातील साहित्याची उचकापाचक केली. गल्ल्यातील ३५ हजार रूपये, ग्राहकांचे दुरुस्तीसाठी आलेले दोन मोबाईल, एक लॅपटॉप, पॉवर बँक, ब्लू टूथ हेडफोनसह मोबाईल ॲक्सेसरीज असा एक लाखांचा ऐवज चोरून नेला. तीन चोरटे शेजारील दुकानदाराच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. मागील महिन्यातही भावीनिमगाव, दहिगावने येथे भर दुपारी चाेरांनी लाखोंचा ऐवज चोरला होता.
---
दूरक्षेत्रात कायमस्वरूपी पोलीस हवेत..
शेवगाव पोलीस स्टेशन अंतर्गत दहिगावने गटातील शहरटाकळी येथे १२ मार्च २०१९ रोजी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे व तत्कालीन पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या हस्ते पोलीस दूरक्षेत्राचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासून सुरू झालेल्या या पोलीस दूरक्षेत्राला २४ तास कर्मचारी उपलब्ध असावेत, अशी मागणी परिसरातील नागरिक वारंवार करत आहेत. या मागणीकडे शेवगाव पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.