घोडेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली सात महिने बंद असलेली मंदिरे उघडण्यास परवानगी मिळाल्यानंतर दोनच दिवसात घोडेगाव येथे चाेरीचा प्रकार घडला. येथील ग्रामदैवत घोडेश्वरी मंदिराच्या मखराची सतरा किलो चांदी बुधवारी रात्री चोरांनी लंपास केली.
मंदिरात कार्तिक मास निमित्त काकडा, भजन, आरती होते. महिला भजनी मंडळाचे भजन असते. गुरुवारी पहाटे काकडा भजनासाठी जमलेल्या भजनी मंडळाच्या महिलांना मंदिराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. छोट्या दरवाजातून आत डोकावून दर्शन घेताना चांदीचे मखर तेथे दिसले नाही. त्यांनी ही बाब पुजारी आदिनाथ माने यांना सांगितली. त्यानंतर येथे चोरी झाल्याचे लक्षात आले.
सकाळी साडेसहा वाजता सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी मंदिर परिसरात येऊन पाहणी केली. सकाळी साडेआठ वाजता ठसे तज्ज्ञांचे पथक येऊन काही नमुने घेऊन गेले. पावणेनऊ वाजता श्वान पथक आले. श्वान पथकाने मंदिराच्या उत्तर बाजूने असलेल्या लोखंडी दरवाजाकडून माग काढला.