घारगाव : दुचाकींची चोरी करून या वाहनांची पुणे जिल्ह्यात विक्री करणारी पाचजणांची टोळी खेड (जि. पुणे) पोलिसांनी पकडली आहे. या टोळीतील चोरटे हे संगमनेर तालुक्यातील पठार भागातील आहेत. या पाचहीजणांना तपासासाठी घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे दुचाकी चोरीच्या इतरही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
या दुचाकी चोरीप्रकरणी नवनाथ विजय पवार (वय २१, रा. माळवाडी, साकूर, ता. संगमनेर) सुनील रामनाथ जाधव (वय १९, रा. माणूसवाडी, रणखांब, ता. संगमनेर), अजित रावसाहेब केदार (वय २२, रा. रणखांब, ता. संगमनेर), रमेश अंबादास दुधवडे (वय १९, रा. खैरदरा नांदूर, ता. संगमनेर), शिवाजी पोपट कातोरे (वय २१, रा. जांबूत, ता. संगमनेर) या पाचजणांना अटक करण्यात आली आहे.
खेड पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना त्यांनी संशयावरून या पाचजणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, ते संगमनेर तालुक्यातील असून, दुचाकींची चोरी करून या वाहनांची पुणे जिल्ह्यात विक्री करत असल्याचे समजले. जुन्नर, नारायणगाव (जि. पुणे), घारगाव, संगमनेर, अकोले व पारनेर या सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून या पाचजणांनी दुचाकी चोरल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी १५ दुचाकी त्यांच्याकडून ताब्यात घेतल्या आहेत. या सर्वांना घारगाव पोलिसांकडे वर्ग केले असून, सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.