घारगाव : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पोखरी-बाळेश्वर या ग्रामपंचायतीच्या भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेचे तीस लोखंडी पाइप अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना २७, २८ मार्च रोजी घडली. या प्रकरणी सोमवारी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोखरी बाळेश्वर येथे २००८ साली भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पाइपलाइनचे टाकण्यात आली आहे. सद्यस्थितीत उन्हाळा सुरू झाल्याने ही पाइपलाइन बंद स्थितीत होती. याचा गैरफायदा घेऊन येथील प्रगती विद्यालयाच्या शेजारूनच गेलेल्या पोखरी बाळेश्वर ग्रामपंचायतीची भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेचे ४९ हजार ५०० रुपयांचे तीस लोखंडी पाइप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
पाइपच्या चोरीची माहिती मिळताच, ग्रामसेवक अतिफ फहीम शेख (रा.म.पो.फातेमा हौसिंग सोसा.सुभेदारवस्ती रोड, ता.श्रीरामपूर ह.मु.शिवाजीनगर, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकाॅन्स्टेबल आदिनाथ गांधले हे करीत आहेत.