लोकमत विशेष मुलाखत अहमदनगर : शहरातील घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. प्रत्येकाने घरात साचलेला ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीतच टाकावा. कुणीही रस्ते, सार्वजनिक , खासगी ठिकाणी कचरा टाकू नये. नगरकरांनी घर व परिसर स्वच्छ ठेवून स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतल्यास नगर शहराला २५ कोटींचे बक्षीस मिळू शकते, अशी अपेक्षा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. केंद्र सरकारचे स्वच्छ सर्वेक्षण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने बुधवारी महापौरांशी संवाद साधला.प्रश्न : शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने काय उपाययोजना केल्या आहेत ?वाहनांची संख्या वाढवून प्रत्येक प्रभागातील घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जात आहे. शहरातील ८० टक्के कचरा दररोज संकलित होतो. पहिल्या तिमाहीमध्ये देशात नगरचा क्रमांक २४४ वरून ७८ वर आला आहे. तसेच शौचालयामध्ये उच्च श्रेणी मिळविली असून, स्वच्छतेत मोठी प्रगती झाली आहे. स्वच्छतेचा हा आलेख आणखी पुढे नेण्यासाठी महापालिकेकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी कचरा रस्त्यावर न टाकता तो घंटागाडीतच टाकावा, जेणे करून नगर शहर आहे त्यापेक्षा स्वच्छ होईल.प्रश्न- महापालिकेची वाहने वेळेवर येत नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे?यापूर्वी वाहनांची संख्याच कमी होती. त्यामुळे सर्वच भागात वाहने देणे शक्य नव्हते. परंतु, आता वाहनांचा प्रश्न राहिलेला नाही. सध्या ७४ वाहनांव्दारे कचरा संकलित केला जातो. याशिवाय आणखी ६४ वाहनांची खरेदी अंतिम टप्प्यात आहे. वाहने उपलब्ध झाल्याने वाहने वेळेवर जातात. उलटपक्षी घंटागाडी दररोज नको, दिवसाआड पाठवा, अशी मागणी नागरिक करत आहेत. तसेच घंटागाडी कुठे आहे, याची माहिती नागरिकांना मोबाईलवर मिळणार आहे. त्यासाठीचे अॅप विकसित करण्यात आले आहे. ते लवकरच नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. प्रश्न- खासगी भूखंडांमध्ये मोठ्या प्रमाणात कच-याचे ढीग साचलेले दिसतात?- महापालिकेने रस्ते, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. शहर कंटेनरमुक्त करण्यात आले असून, तेथील जागा स्वच्छ करण्यात आली आहे. नागरिकांनी खासगी भूखंडावर प्लास्टीक, कचरा, बांधकाम साहित्य टाकू नये. यापूर्वी जो राडारोडा पडलेला आहे, तो उचलून घेण्यात येत आहे. दररोज किमान १०० ते १५० टन बांधकाम साहित्य उचलून घेतले जात आहे. त्यामुळे बांधकाम साहित्याचा प्रश्न राहणार नाही.प्रश्न- अनेक ठिकाणी मोकळ्या बाटल्या व प्लास्टीक पिशव्यांचा खच पडलेला दिसतो?- शहरातील बाजारपेठा, व्यावसायिक परिसर, गर्दीच्या ठिकाणी रात्री दहानंतर स्वच्छता करण्यात येते. हॉटेलमधील कचरा नियमित उचलला जातो. दुकानदारांना प्लास्टीक वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. प्लास्टीक चा वापर करणा-यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुकानदार, वाईनशॉप धारकांनी परिसरात कुणीही मोकळ्या बाटल्या टाकणार नाही, याची काळजी घ्यावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल.प्रश्न- स्वच्छ सर्वेक्षणात नगरसेवकांचा सहभाग आहे का ?- स्वच्छ सर्वेक्षणात नगरसेवकांचा सहभाग आहे. महापालिकेने वाहने उपलब्ध करून दिली असून, वाहनांचे नियोजन करण्यासाठी नगरसेवकांचे मोठे सहकार्य मिळत आहे. नगरसेवकांबरोबरच विविध सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना, बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट असोसिएशन, हरियाली संस्था आदी संघटना व संस्थाही सहभागी आहेत. स्वच्छतेत काम करण्याची इच्छा असणा-या संस्थांनी महापालिकेशी संपर्क करावा.प्रश्न- कचरा संकलन व वाहतुकीला गती मिळाली, पण खत प्रकल्प ठप्प आहेत?- नगर शहरासाठी २८ कोटींचा स्वच्छतेचा आराखडा मंजूर झाला आहे. या निधीतून बुरुडगाव येथे खत प्रकल्प प्रस्तावित आहे. सावेडी उपनगरात दुसरा प्रकल्प सुरू असल्याने कच-यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे.प्रश्न- रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमालीचे वाढलेले आहे, याबाबत काय उपाय योजना केल्या आहेत?- शहरातून जाणारे महामार्गांसह अंतर्गत रस्त्यांचे दुभाजक, फुटपाथ स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महामार्गावरील दुभाजक व फुटपाथ स्वच्छ करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आले आहे. त्यांच्याकडून स्वच्छतेची कार्यवाही सुरू होईल.
...तर नगर शहराला मिळू शकते २५ कोटींचे बक्षीस-बाबासाहेब वाकळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 1:52 PM