जामखेड (अहमदनगर) : धनगर समाजासाठीच्या आदिवासी कल्याणच्या २२ योजना तातडीने लागू कराव्यात. धनगर समाजासाठीचे दोन वर्षांच्या काळातील दोन हजार कोटी रुपये गेले कोठे? वीस हजार घरेही बांधली नाहीत. या सर्व मागण्यांबाबत तत्काळ निर्णय न घेतल्यास धनगर समाज न्याय्य मागण्यांसाठी मुंबई शहराला घेराव घालेल, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चोंडी (ता. जामखेड) येथे पडळकर यांनी सोमवारी सकाळी भेट देऊन अभिवादन केले.
ते म्हणाले, धनगड व धनगर हे दोन समाज नाहीत तर एकच आहे. राज्यात ‘धनगड’ समाज अस्तित्वात नाही, असे यापूर्वी कॉंग्रेस सरकारने सांगितले आहे. आता हे सरकार धनगर समाजाची बैठक घ्यायला तयार नाही. न्यायालयात खटला चालू आहे, तेथे वकील दिला जात नाही. ते आरक्षण द्यायला टाळत आहेत. राज्याच्या चाव्या काका-पुतण्याच्या हातात येतात त्यावेळी धनगर समाजावर अन्यायच होतो, अशी टीका त्यांनी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली.
धनगर समाजातील मुलांना विनाशुल्क इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळावा, वसतिगृहात राहण्यासाठी ठरवून दिलेले अनुदान मिळावे, सूतगिरणीचा प्रश्न सोडवावा, मेंढीच्या मांसाच्या निर्यातीबाबत प्रयत्न करावा, वनीकरण विभागाने तीन वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांची ठिकाणे कुरण म्हणून मेंढ्यांसाठी उपलब्ध करून द्यावीत आदी मागण्यांकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे, असे पडळकर म्हणाले.
.............
पडळकरांचे लाइव्ह, रोहित पवारांचे स्वच्छता अभियान
कोरोनामुळे यावर्षीही चोंडीत अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव साजरा झाला नाही. स्मारकातही कुणाला प्रवेश नव्हता. त्यामुळे पडळकर यांनी स्मारकाबाहेर घोंगडीवर बसून फेसबुक लाइव्ह केले. माजी मंत्री राम शिंदे, आमदार रोहित पवार यांनीही चोंडीत अहिल्यादेवींना अभिवादन केले. रोहित पवार यांनी स्मारकाजवळील सीना नदीपात्रातील २०० पायऱ्यांची स्वच्छता मोहीम राबविली.
...................