लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्यांना होम क्वॉरंटाइन होण्यास परवानगी आहे. परंतु, अनेक रुग्ण घराबाहेर पडताना निदर्शनास आले असून, ही बाब गंभीर आहे. कोरोनाचे रुग्ण रस्त्यावर फिरताना आढळून आल्यास त्यांना पकडून मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाईल, असा इशारा आयुक्त शंकर गोरे यांनी दिला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. साैम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी महापालिकेने एक हजार बेड उपलब्ध करून दिलेले आहेत. परंतु, या सेंटरमध्ये रुग्ण दाखल होत नाहीत. बहुतांश रुग्ण हे घरी उपचार घेत आहेत. घरी उपचार घेण्यास परवानगी आहे. परंतु, त्यांच्यामुळे कुटुंबातील इतर व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होत असून, हे रुग्ण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. कोरोनाबाधित ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत, अशा रुग्णांनी महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन आयुक्त गोरे यांनी केले आहे.
ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शासनाने संचारबंदी लागू केलेली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेकडून बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तपासणीसाठी पाठविले जात आहे. बाधित रुग्णांमुळे इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. नागरिकांनी स्वत:हून काळजी घेण्याची गरज आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, या सेंटरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत, असे म्हणाले.
....
माहिती स्वतंत्र कक्ष
महापालिकेने रुग्णांच्या माहितीसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केलेला आहे. या कक्षातून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कुठे बेड शिल्लक आहेत, याबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन गोरे यांनी केले आहे.