अहमदनगर : सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. राहुल गांधी हे नेते आहेत. त्यामुळे शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद देण्याची शिवसेना नेते संजय राऊत यांची मागणी योग्य नाही. या मुद्यावरुन काँग्रेस पक्ष उध्दव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढू शकतो. राऊत यांच्या मागणीने सरकारमध्ये मतभेद होतील. यातून सरकार कोसळेल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.
रामदास आठवले हे सोमवारी रात्री काही काळ नगरच्या सरकारी विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘जेंव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा उध्दव ठाकरेंचे सरकार पडेल थंड... लवकरच होणार आहे, या सरकारमध्ये बिघाडी.. जाणार आहे महाविकास आघाडी..’ अशी चारोळी करुन रामदास आठवले म्हणाले, हे सरकार लवकरच जाणार आहे. काँग्रेसचा वेळोवेळी अपमान होत असेल तर त्यांनी देखील शिवसेना व राष्ट्रवादी सोबत न राहता सरकारचा पाठिंबा काढावा, असे आवाहन केेले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबद्दल मला आदर आहे. ते सक्षम असे नेते आहेत. ते यूपीएचे अध्यक्ष व्हावेत, असे शिवसेनेचे मत असले तरी काँग्रेस पक्ष ते अजिबात मान्य करणार नाही, असेही आठवले यावेळी म्हणाले.