निघोज (अहमदनगर) : महिलांविषयी जर तुम्ही आक्षेपार्ह बोलणार असाल, महिलांचा सातत्याने अपमान करणार असाल तर या महिला तुमचे गाल रंगविल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असे सांगत भाजपला ईडीचा डाव महागात पडेल, असा इशारा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिला.
निघोज येथे १ कोटी रुपये खर्चाच्या अभ्यासिकेचे व इतर विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी चाकणकर निघोज येथे आल्या होत्या. या वेळी त्यांनी प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. तसेच भाजपवरही जोरदार टीका केली. चाकणकर म्हणाल्या, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर केंद्रातील भाजप सरकार करीत आहे. तुम्ही जितका जास्त यंत्रणेचा गैरवापर करणार, तेवढी जास्त सहानुभूती आमची वाढणार आहे. यंत्रणेचा दुरुपयोग केल्यावर काय होते, हे थोड्याच दिवसांत भाजपला समजेल, असा इशारा चाकणकर यांनी दिला. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, पारनेर-नगरचे आमदार नीलेश लंके, माजी आमदार पोपटराव गावडे, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पांडुरंग पवार, मळगंगा ग्रामीण ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकरराव कवाद, सचिव शांताराम कळसकर तसेच उपजिल्हाधिकारी संदीप निचित, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, बाबाजी तरटे, अशोक सावंत, ठकाराम लंके, ज्ञानेश्वर लंके, शिवाजी लंके, विठ्ठलराव कवाद, चित्रा वराळ, माउली वरखडे, जितेश सरडे, सुदाम पवार, राजेश्वरी कोठावळे, चंद्रकांत लामखडे, बाळासाहेब लामखडे आदी उपस्थित होते.
...........
...तर शिंगावर घेण्याची तयारी
आमदार नीलेश लंके म्हणाले, मी संघर्षातून आलेलो आहे. त्यामुळे माझ्यावर आतापर्यंत अनेक संकटे आली. अनेकांनी टीका केली. आरोप केले. त्यामुळे मी माझ्या कामांना प्राधान्य देतो. कोणी जाणूनबुजून अंगावर आले तर शिंगावर घेण्याचीही तयारी आहे, अशा शब्दांत लंके यांनी विरोधकांवर टीका केली.
....................
राष्ट्रवादीत प्रवेश
निघोज येथील सुधामती कवाद व रमेश वरखडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी चाकणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे निघोज गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली असल्याची प्रतिक्रिया लंके यांनी व्यक्त केली.
........
१४ रूपाली चाकणकर