यवतमाळ येथील पोलीस चौकीच्या बांधकामप्रकरणी तत्कालीन पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांच्याविरुद्ध अमरावतीच्या माहिती आयुक्तांनी काही निरीक्षण नोंदविले होते. ही बाब ॲड. काळे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांचाही चौकशीत समावेश करावा, असे आदेश बजावण्यात आले. उपाधीक्षक मदने हे सध्या संगमनेर येथे कार्यरत आहेत.
खंडपीठाने याप्रकरणी उपाधीक्षक मदने, तत्कालीन शहर पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, निरीक्षक मसूद खान यांना नोटिसा बजावल्या होत्या. निरीक्षक बहिरट यांची पुणे येथे बदली झाली आहे. दरम्यान, ४ नोव्हेंबर रोजी खंडपीठाने आपल्या आदेशात भारतासारख्या देशात सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व संस्थांनी नि:पक्षपातीपणे काम करणे अपेक्षित असल्याचे तसेच कायदा मोडणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांकडून कोणत्याही कारणासाठी देणगी घेणे उचित नाही, असेही म्हटले होते.
-----
पारनेरचा अहवाल मागविला
पारनेर येथे २०१८ मध्ये पोलीस ठाण्याचे लोकवर्गणीतून सुशोभीकरण करण्यात आले होते. त्या प्रकरणात लोकजागृती सामाजिक संस्थेचे रामदास घावटे व बबन कवाद यांनी खंडपीठात धाव घेतली होती. तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख रंजनकुमार शर्मा यांना तेथील पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी खंडपीठाने त्याप्रकरणी गाडे यांच्यावर झालेल्या कारवाईचा अहवाल मागविला आहे. निरीक्षक गाडे हे सध्या राहुरी येथे कार्यरत आहेत.