श्रीगोंदा : मुंबई-लातूर राष्ट्रीय महामार्गाचा आराखडा करतानाच श्रीगोंदा शहरातील फूटपाथ, भुयारी गटारीचे नियोजन केलेले नाही. त्यामुळे नगरपालिका पदाधिकारी, नगरसेवक आक्रमक झाले आहेत. अंदाजपत्रकात फूटपाथ, भुयारी गटार कामाचा समावेश करण्याची मागणी केली जात आहे.
याबाबत श्रीगोंदा येथील पंचायत समितीच्या सभागृहात आ. बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली. यावेळी नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे, प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार, तालुका गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, मनोहर पोटे, बापू गोरे, संग्राम घोडके, राजू लोखंडे, सतीश मखरे, प्रशांत गोरे, संतोष क्षीरसागर आदी उपस्थित होते.
मुंबई-लातूर महामार्गाचे काम सध्या पहिल्या टप्प्यात न्हावरा ते आढळगावदरम्यान सुरू आहे. श्रीगोंदा शहरातून १० किमी लांबीचा हा रस्ता जातो. त्यातील चार किमी रस्ता मुख्य बाजारातून पेठेतून जात आहे.
स्टेशन रोड ते औटेवाडीदरम्यान चौपदरी रस्ता होणार आहे. हा रस्ता नगरपालिकेने अगोदरच चौपदरी केला आहे. त्यावर मजबुतीकरण व काँक्रिटीकरण केले जाणार आहे. पथदिवे, दुभाजक जुनेच राहणार आहेत. सरस्वती नदीवरील पुलांचे मजबुतीकरण होणार आहे.
भुयारी गटार व फूटपाथ नसल्याने वाहतुकीस अडथळा येणार आहे. त्यामुळे फूटपाथ व भुयारी गटारीचे नियोजन करा, अशी मागणी प्रशांत गोरे यांनी केली.
आ. बबनराव पाचपुते यांनी सुधारित कामाचे अंदाजपत्रक व जागा मोजणी करून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे प्रस्ताव पाठवा. त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
----
सुधारित अहवाल पाठविणार
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अधिकारी दिलीप तारडे म्हणाले, भुयारी गटार, फूटपाथबाबत वरिष्ठांना सुधारित अहवाल पाठवणार आहे. मात्र, आराखड्यात भुयारी गटार, फूटपाथचे नियोजन नाही. येथील रस्ता चौपदरी करण्यात येणार आहे.