बाळासाहेब काकडे । श्रीगोंदा : कुकडी लाभक्षेत्रातील बागायतदारांचे गाव अशी ओळख असलेल्या लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथील शेती व्यवसायाची पाण्याअभावी वाताहत झाली आहे. सततची दुष्काळी स्थिती, पशुखाद्याचे वाढते दर आणि वाढत्या यांत्रिकीकरणामुळे गावात अवघ्या ११ बैलजोड्या उरल्या आहेत. हे वास्तव शनिवारी म्हणजे भाद्रपदी बैल पोळ्याच्या दिवशी उघड झाले. लोणीव्यंकनाथ गावची लोकसंख्या १२ हजार आहे. मनमाड-फलटण राष्ट्रीय महामार्गावरील हे गाव आहे. या गावाची शेती क्षेत्रही मोठे आहे. गावचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. पूर्वी बैलांच्या सहायाने शेतकरी शेतीची मशागत, पेरणी करीत होते. त्यामुळे ५०० हून अधिक बैलजोड्या गावात होत्या. दिवसेंदिवस येथील नियमित शेतीसाठी मिळणारे पाणी कधी तरी मिळू लागले. त्याचा फटका शेती उद्योगाला बसला. तसेच काही वर्षांच्या अंतराने सारखा दुष्काळही पडत आहे. पशुखाद्याचा भावही वाढला आहे. त्यामुळे शेतक-यांना बैलजोड्या सांभाळणे जिकिरीचे झाले आहे. तरी काही शेतकरी परंपरा कायम राखण्याठी तर काहीजण हौसेखातर बैलजोडी सांभाळत आहेत. लोणी व्यंकनाथ येथे भाद्रपदी पोळा साजरा केला जातो. शनिवारी सायंकाळी येथे बैलजोड्या पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी होती. पण मिरवणुकीसाठी गावात अवघ्या अकराच बैलजोड्या आल्या. बैलजोड्या कमी झाल्याने बैल सजविण्याचा अगर बैलांसाठी लागणारे दैनंदिन साहित्यांचा व्यवसाय संपला आहे. ही चिंतेची बाब आहे. काही दिवसांनी बैलांचे आठवडे बाजारही बंद पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. बैलजोडी सांभाळणे अवघड.. बैलजोडी सांभाळणे सध्या खूप अवघड झाले आहे. दररोज काम नसेल तर चा-याचा खर्चही परवडत नाही. त्यामुळे बैलजोडी सांभाळणे शेतक-यांना परवडत नाही. तरी हौस म्हणून काही शेतकरी बैलजोडी पाळीत आहेत ही वस्तुस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतक-यांना निसर्गाचीही साथ मिळत नाही. शेती व्यवसायातही अनंत अडचणी आहेत, असे येथील शेतकरी उद्धव काकडे यांनी सांगितले.
अख्या गावात उरल्या अवघ्या अकरा बैलजोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 2:02 PM