चंद्रकांत शेळके, अहमदनगर: मागील आठवड्यातील अवकाळी पावसानंतर आता तीव्र उन्हाचा चटका जाणवू लागला असून जिल्ह्यात संगमनेर व अकोले तालुक्यात दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात झाली आहे. अजून उन्हाळ्याचे अडिच महिने बाकी असल्याने टँकरची संख्या वाढणार आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने टंचाई कृती आराखडा तयार करून त्याला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेतली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात यंदा ३२१ गावे आणि १ हजार ३९ वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई जाणवू शकते. यासाठी ७ कोटी ३७ लाखांची तरतूदही करण्यात आली आहे. यात टँकरसाठी साडेसहा कोटी, तर विहिरी अधिग्रहणासाठी ८१ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
त्यानुसार आता जिल्ह्यात पहिला टँकर अकोले तालुक्यातील ५ वाड्यांना व नंतर संगमनेर तालुक्यातील एका गावात सुरू करण्यात आला आहे. अकोल्यातील ५ वाड्यांना साडेतीन, तर संगमनेरमधील एका गावाला १ अशा साडेचार खेपा रोज शासकीय टँकरने केल्या जात आहेत. यात संगमनेर तालुक्यातील ९२२, तर अकोले तालुक्यातील १७१० अशा एकूण २६३२ लोकांना टँकरने पाणीपुरवठ होत आहे. ७.३७ कोटींचा आराखडा मंजूर
यंदा जिल्हा परिषदेने ७ कोटी ३७ लाख ५२ हजार खर्चाचा टंचाई आराखडा तयार केला आहे. यात खासगी विहिरी अधिग्रहण करण्यासाठी ८१ लाख ४५ हजार, टँकर भरण्यासाठी २१ लाख २३ हजार, टँकरद्वारे, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ६ कोटी ३२ लाख, नळ योजना विशेष दुरुस्तीसाठी २ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"