अहमदनगर : काही तालुक्यातील नागरिकांना नगरमध्ये येणे गैरसोयीचे होत होते. त्यामुळे एक अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे सुरू करण्यात येणार आहे. त्याचा आणि जिल्हा विभाजनाचा कुठलाही संबंध नाही, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालया विषयी माहिती देताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, की महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्याकडे साडेसात वर्ष महसूल खाते होते. त्यांना असा कुठलाही निर्णय घेता आला नाही. मात्र महसूल मंत्री पद आल्यानंतर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा विभाजनाचा निर्णय अजून झालेला नाही. जिल्हा विभाजन झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय कुठे करायचा याचा निर्णय होईल. परंतु , काही लोक यात राजकारण करत आहेत, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली.