आघाडीत पुन्हा वाद नाही :अजित पवार यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 02:24 PM2018-09-27T14:24:51+5:302018-09-27T14:24:54+5:30
आघाडीच्या सरकारच्या काळात जे घडलं, ते पुन्हा घडणार नाही, असा विश्वास निर्माण करण्याचे काम दोन्ही पक्षाकडून केले जाईल,असे सांगून आघाडीत आता वादाची पुनरावृत्ती होणार नाही, अशी नरमाईची भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
अहमदनगर : आघाडीच्या सरकारच्या काळात जे घडलं, ते पुन्हा घडणार नाही, असा विश्वास निर्माण करण्याचे काम दोन्ही पक्षाकडून केले जाईल, असे सांगून आघाडीत आता वादाची पुनरावृत्ती होणार नाही, अशी नरमाईची भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
औरंगाबाद येथील विभागीय मेळावा संपवून पुण्याकडे जात असताना पवार यांनी सायंकाळी नगरमध्ये थांबून शहरातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला़. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. राहुल जगताप, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, शहराध्यक्ष माणिक विधाते, हमाल पंचायतचे अविनाश घुले, माजी महापौर अभिषेक कळमकर आदी यावेळी उपस्थित होते़. अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जगात सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल महाराष्ट्रात आहे. महागाई वाढत असताना पाच हजार कोटींच्या कर्जाची किमया सरकारने केली आहे. राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे, म्हणून समविचारी पक्षांना सोबत घेऊन आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केला आहे़.त्यादिशेने हालचाली सुरू आहेत. जिथे ज्या पक्षाची ताकद असेल, तिथे त्या पक्षाने उमेदवार द्यावा़ त्याला अन्य पक्षांनी सहकार्य करावे, असा जागा वाटपाचा फार्म्युला असेल. यासंदर्भात दोन्ही पक्षांची मुंबईत बैठक आहे. या बैठकीत आघाडीबाबत चर्चा होईल. आम्ही भारतीय आहोत, अशी ज्यांची भूमिका आहे, त्या सर्वांना एकत्र आणून त्यांची मोट बांधण्याचे काम सुरू आहे. मागील आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांवर आरोप केले गेले. दोन्ही काँग्रेसमध्ये वाद झाले, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्रितपणे प्रयत्न करतील आणि तसा विश्वास जनतेला देतील, असे पवार म्हणाले.
दक्षिणेचा निर्णय चर्चेने
जागा वाटपाबाबत येत्या ६ व ७ आॅक्टोबर रोजी मतदारसंघातील नेत्यांशी चर्चा होणार आहे. स्थानिक नेत्यांशी चर्चा करूनच दक्षिणेचा निर्णय होईल, परंतु, याबाबत माझ्यासह कुणालाही बोलण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
स्थानिक नेत्यांनी पालिकेचा निर्णय घ्यावा
वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल़ तो महापालिकेला लागू नसेल. स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन आघाडी करायची की स्वतंत्र लढायचे याचा निर्णय घ्यावा. गरज असल्यास त्यांना मार्गदर्शन केले जाईल असे पवार म्हणाले.