दोन शेजाऱ्यांमध्ये रात्रीच्या वेळी वाद झाला. त्यातील एकाने वादाची माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र यावेळी तेथून पोलिसांना एक संशयित टेम्पो दिसून आला. त्यात २५ किलो वजनाचे दूध भेसळीसाठी वापरले जाणारे ५९ भुकटीचे पाकिटे जप्त करण्यात आली.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाला सोमवारी रात्रीच माहिती देण्यात आली. याबाबत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी दिवसभरात अन्न आणि औषध तपासणी पथकाला पोलिसांकडून तीन ते चार वेळा निरोप पाठविण्यात आला. मात्र अन्न आणि औषध तपासणी पथकाने कोणतीही तत्परता दाखवली नाही. मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झालेला नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी तातडीने ही कारवाई केली. मुद्देमाल ताब्यात घेतला. मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या अधीन राहूनच ही कारवाई करावी लागते. अन्यथा आरोपींना त्याचा लाभ मिळतो.
-----
पकडलेल्या संशयितांचे काय?
याप्रकरणी पकडण्यात आलेल्या संशयितांना दोन दिवस कसेकाय ताब्यात ठेवता येईल. आमचाही नाईलाज आहे, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांनी लोकमतला दिली. दूध भेसळीसारख्या अत्यंत संवेदनशील गुन्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने घेतलेली भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
.....